जव्हार,प्रतिनिधी,
शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन,
खरवंद गाव,तालुका जव्हार, येथील शेतकऱ्यांसाठी हरभरा लागवड,सेंद्रिय कीड व्यवस्थापन, व काढणी पश्चात व्यवस्थापन,या विषयांवर नुकताच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तालुका कृषी विभाग,जव्हार व जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.हरभरा लागवड हा २०२४-२५ या राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानाचा एक महत्त्वाचा भाग असून, त्याची देखरेख तालुका कृषी विभागाकडून करण्यात येते. या उपक्रमांतर्गत २० शेतकऱ्यांना बी-बियाणे,खते, कीड नियंत्रक आणि बहु-पोषक द्रव्ये पुरविण्यात आली.
प्रशिक्षणादरम्यान,सुनील महाला यांनी सेंद्रिय खतांचा वापर,जमिनीची पोषक पातळी राखणे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर,याविषयी माहिती दिली.त्यांनी हरभरा लागवडीसाठी वनस्पती-आधारित कीटकनाशकांचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना त्याचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.तालुका कृषी विभागाचे कृषी सेवक योगेश कामडी यांनी कार्यक्रमाचे महत्त्व आणि उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.संगिता माळशे यांनी गटशेतीचे महत्त्व आणि सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर याविषयी सखोल चर्चा केली. त्यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे तसेच प्रशिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.
हा कार्यक्रम जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलो विवेक शहारे यांनी आयोजित केला होता.शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरवंद शेतकरी समुहाचे अध्यक्ष सदाशिव राऊत यांनी सांगितले की, ” हरभरा लागवड,कीड व्यवस्थापन आणि वनस्पती-आधारित उपाय,याविषयी आम्ही प्रशिक्षित झालो आहोत,याचा आनंद वाटतो. ” हा कार्यक्रम गावातील शेतकऱ्यांच्या संपन्नतेसाठी व कृषी उत्पादनवाढीसाठी नवी दिशा देणारा ठरला आहे.

