जव्हार प्रतिनिधी,
डॉ.पंजाबराव देशमुख यांची शतकोत्तर रौप्य जयंती उत्साहात साजरी,
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त “डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनकार्य व विचार” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. एस.आर.व्हंडे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षण,समाजसुधारणा आणि कृषी क्रांतीतील योगदानाबाबत सखोल माहिती दिली.ते आपल्या भाषणात म्हणाले,डॉ.देशमुख यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवली आणि विदर्भाचा शैक्षणिक विकास साधला.त्यांनी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांसाठी न्यायाचा मार्ग मोकळा केला. कृषी विद्यापीठाच्या संकल्पनेची मांडणी, कृषी प्रदर्शनांचे आयोजनआणि संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान,हे क्रांतिकारक ठरले आहेत.डॉ पंजाबराव देशमुख यांनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर व डॉक्टरेटची पदवी मिळवली.परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक प्रणालींचे ज्ञान त्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणले. त्यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था,आज महाराष्ट्रात ज्ञानदानाचे कार्य करीत आहे आणि बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे योगदान देत आहे. यामुळे त्यांना ” शिक्षणमहर्षी,” व ” कृषी क्रांतीचे जनक,” म्हणून ओळखले जाते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम. आर.मेश्राम होते.त्यांनी डॉ. देशमुख यांच्या विचारांची नवीन पिढीने अंमलबजावणी करून देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.प्राचार्य डॉ.गोपाळ ढोले यांनी संस्थेचा इतिहास मांडला,तर संयोजक डॉ. राहुल सुडके यांनी व्याख्यानमालेचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमास संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य सुरेशदादा खोटरेसुधीर बापू देशमुख,प्राचार्य डॉ. गोपाळराव खेडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.डॉ. राहुल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व स्टाफ सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

