दीपक मोहिते,
” नैसर्गिक संकट,”
पालघर जिल्ह्याला दुष्काळ यादीतून का वगळले ? शेतकऱ्यांचा आक्रोश,
राज्य सरकारने २६ सप्टें. २०२६ रोजी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती ( ट्रिगर -१ ) जाहीर केली. या यादीत ठाणे विभागातील १२ तालुके आहेत.रायगड ( श्रीवर्धन १ ), रत्नागिरी ( ३ ) आणि सिंधुदुर्ग ( ८ ). ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही.
सरकारने महाराष्ट्र दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार निकष लावला आहे. जून ते सप्टें.या खरीप हंगामात पर्जन्यमानात १८% पेक्षा जास्त तूट असणे आवश्यक होते.पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे सरासरी आकडेवारीवर तूट १८ % पेक्षा कमी दाखवण्यात आली.

त्यामुळे ट्रिगर -१ लागू झाला नाही आणि जिल्हा आपोआप यादीबाहेर गेला.
जिल्ह्यातील भातपीक दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात आहे. जुलैत पाऊस जास्त झाला म्हणून भाताची रोपणी उशिराने झाली. आता पीक पोटरी अवस्थेत ( दाणे भरण्याची संवेदनशील अवस्था ) आले आहे, जेथे पाण्याची सर्वात जास्त गरज आहे. पण गेल्या ३ आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे पीक करपण्याच्या स्थितीत आले आहे.
पालघरमधील ७ तालुके – पालघर,वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, विक्रमगड हे प्रामुख्याने आदिवासी बहुल आहेत. यादीत नाव नसल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना १२ सवलती मिळणार नाहीत. जमीन महसूल माफी, पीक कर्ज पुनर्गठन, वीज बिल सवलत, परीक्षा फी माफी, मनरेगा कामे, टँकर, चारा-धान्य पुरवठा इ..केवळ पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे, जिओ-टॅगिंग करून दुष्काळ जाहीर करावा,” अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सरकारचे म्हणणे आहे की पीक नुकसानीची मदत वेगळ्या अधिसूचना काढून जाहीर होईल, पण त्यासाठी पंचनामे सुरू होणे, गरजेचे आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पंचनामेच अद्याप सुरू झाले नाहीत, कारण यादीतच तालुक्याची नांवे नाहीत.

