दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
राज्य दुष्काळाच्या छायेत ; केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर,
राज्यात पडलेल्या दुष्काळाची तीव्रता तपासण्यासाठी केंद्र सरकारचे केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. ८ ते ११ ऑक्टो. असे एकूण चार दिवस हे केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त जिल्ह्यात फिरून तीव्रता तपासणार आहे.
यंदा राज्यात प. महाराष्ट्र, मराठावाडा, विदर्भ या महसूल विभागात दुष्काळ पडला आहे. या विभागात अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, छ. संभाजीनगर, जालना, बीड, नागपूर, यवतमाळ,हे जिल्हे व लगत असलेले टंचाईग्रस्त भागाचा ते दौरा करणार आहेत.काल या पथकाने छ. संभाजीनगर जिल्ह्यात शेंद्रा, जालन्यातील नानेगाव – किनगाव – जामखेड, बीडमधील गेवराई – अर्धमसला येथे बांधावर जाऊन पाहणी केली. आज १० ऑक्टो. रोजी बीड मधील मांजरसुंबा, खंडाळा, पाटोदा भागात पाहणी करत आहेत. हा पाहणी दौरा सुरु होण्यापूर्वी राज्य सरकारने दुष्काळ संदर्भात सादरीकरण केले.
राज्याचे मुख्य सचिव राजेश यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यंदा पावसात पडलेला ६० दिवसाचा खंड, ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने कोरडे गेले, खरीप हंगाम हातून गेला व रब्बी हंगाम देखील संकटात, ३२ जिल्ह्यातील ८० % तालुके दुष्काळामुळे प्रभावित,२३ हजार गावांचे सर्वेक्षण पूर्ण, पाणीटंचाई, टँकर, चारा व मजुरांचे स्थलांतर इ. विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय पथकाचा वस्तूस्थितीदर्शक अहवाल आणि राज्याचा प्रस्ताव यावरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी ( एनडीआरएफ ) मधून मदत जाहीर करण्यात येणार आहे. केंद्राकडून मदत यायला वेळ लागणार असल्यामुळे सरकार आपल्या तिजोरीतून मदत देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

