दीपक मोहिते,
” अस्मानी संकट,”
खरीप पिकानंतर रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात,
यंदा राज्यात सरासरी २१ % कमी पाऊस झाल्यामुळे ग्रामीण भागात रब्बी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परतीच्या पावसावर भिस्त होती,पण परतीच्या पावसाने हात दाखवल्यामुळे लागवड कशी करायची अशा विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.
पाऊस यंदा लवकर माघारी फिरल्यामुळे खरीप पिकावर परिणाम झाला असून रब्बी हंगाम देखील अडचणीत आला आहे. दरवर्षी राज्यात साधारणपणे ९०० मि.मी. च्या आसपास पाऊस पडतो, यंदा तो जेमतेम ८०४ मि.मी इतका पडला. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग व उडीद इ. पिके हातून गेली आहेत. आता पाऊस माघारी परतल्यामुळे रब्बी हंगामातील तूर व कापूस ही नकदी पिकेही बाद झाली आहेत. सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. राज्यात रब्बीच्या हंगामात ५४ लाख हेक्टर जमिनीवर पेरणी होत असते. त्यामध्ये हरभरा, गहू, ज्वारी, मका व करडई या पिकांचा समावेश आहे. या सर्व पिकांना मुबलक पाणी द्यावे लागते. लघुपाटबंधारे विभागाने धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना पिकासाठी धरणातून पाणी मिळणार नाही.त्यामुळे रब्बी पिके कमी पाण्यात घेणे, शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. यंदा पावसाने सप्टें. च्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा प्रवास सुरु केला. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सरकारने राज्याच्या २६५ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत अल निनो अधिक तीव्र होत असल्यामुळे तापमान २ ते ३ अंशानी वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

