दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
उशीरा का होईना, पण एकदाची पहाट झाली तर…
वसई – विरार शहर महानगर पालिकेचे क्रीडा संकुल व नाट्यगृहाचे आज उदघाटन होणार आहे. माजी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली नागरिकांची ही मागणी अखेर मार्गी लागल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पण आता सत्ताधारी बहुजन विकास आघाडी व विरोधी पक्ष असलेल्या
भाजप या दोघामध्ये श्रेय घेण्यावरून ” तू तू मै मै,” सुरु झाले आहे. महापौर अजीव पाटील यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवरुन आता भाजपने जोरदार टिकास्त्र सोडले आहे. नालासोपाऱ्याचे आ. राजन नाईक यांनी ही दोन्ही विकासकामे राज्याचे मुख्यमंत्री ” देवाभाऊ,” यांच्या आदेशामुळे मार्गी लागल्याचा दावा केला आहे. तर वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी थेट महानगरपालिकेच्या आयुक्ताना पत्र लिहून मनपाचे नाट्यगृह व क्रीडा संकुलाच्या उदघाट्न कार्यक्रमाची प्रशासकीय अधिकृतता, राज्य शिष्टाचाराचे पालन,महानगरपालिका मालमत्ता / यंत्रणेच्या वापराबाबत चौकशी व योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडीवरून पुन्हा एकदा नळावरच्या भांडणाला तोंड फुटल्याचे स्पष्ट होत आहे.
विकासकामाचे श्रेय उपटण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष हे दोघे कसे एकमेकांच्या उरावर बसतात, हे वसई – विरारच्या नागरिकांना वारंवार पाहायला मिळते. ही दोन्ही विकासकामे वर्षानुवर्षे कशी रखडली ? याविषयी हे दोघेही चकार शब्द बोलत नाहीत. पण श्रेय लाटण्यासाठी ” पळा, पळा, कोण पुढे पळे तॊ, ” अशा भूमिकेत असल्याचे नागरिकांना पाहायला मिळत आहे. नागरिक मात्र ” कोणाच्याही आरवण्याने एकदाची पहाट झाली,” हेही नसे थोडके,अशा आनंदात आहेत.

