दीपक मोहिते,
राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळी जिल्ह्याची नुकतीच पाहणी केली व लवकरच दुष्काळ जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. मात्र याविषयी अधिसूचना काढण्यासंदर्भात अडचणी येत असल्यामुळे दुष्काळ जाहीर करता येत नाही, असे सांगण्यात येत आहे.
दुष्काळ जाहीर करण्याची नवीन पद्धत ट्रिगर सिस्टीम स्विकारण्यात आल्यामुळे या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारकडून दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यापूर्वी जुन्या पद्धतीने तात्काळ आणेवारी जाहीर व्हायची, ज्या जिल्ह्यात ५० पैश्यापेक्षा कमी आणेवारी असायची तेथे जिल्हाधिकारी दुष्काळ जाहीर करत असत. ही प्रक्रिया अत्यंत जलदगतीने होत असे. पण नव्या पद्धतीमध्ये केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी मिळण्यासाठी विलंब होत असल्यामुळे राज्य सरकारला वेळेत निर्णय घेणे शक्य होत नाही. याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारची वाट न बघता राज्याकडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल, असे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळेल, पण दुष्काळी भागाला ज्या काही सवलती मिळतात, त्या मिळणार का ? हा खरा प्रश्न आहे. उदा. पशुसाठी चारा छावण्या सुरु करणे, विद्यार्थ्यांची फी माफ करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, कर्जाच्या वसुलीला स्थगिती देणे, त्यामुळे नवीन ट्रिगर पद्धत काय आहे हे तपासायला लागणार आहे.
ट्रिगर १ : पावसाची तूट – जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा २५ % पेक्षा अधिक पावसाची तूट व सलग तीन ते चार आठवडे पावसाचा खंड,
ट्रिगर २ : जमिनीतील ओलावा, पिकाच्या पेरणीचा डेटा व उपलब्ध पाणीसाठा, हे दोन्ही ट्रीगर लागल्याशिवाय केंद्र सरकार राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणातून मदत मान्य करत नाही. त्यामुळे राज्य सरकारला प्रत्येक तालुक्याचा डेटा गोळा करावा लागतो. याविषयी राज्य सरकारचे म्हणणे आहे कि ही दिरंगाई नसून कायदेशीर प्रक्रिया आहे. ही पद्धत अवलंबल्यास केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळवता येते. तर विरोधी पक्षाचे म्हणणे आहे कि शेतकरी बांधावर रडत असताना, सरकार अधिक मदत मिळवण्याच्या नावाखाली वेळ काढत आहे. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर सध्या पहिली यादी जाहीर झाली आहे. दुसरी व तीसऱ्या यादीत आता उर्वरित तालुक्याचा समावेश होणार आहे. दरम्यान सरकारने या ज्वलंत विषयी तातडीने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

