जव्हार प्रतिनिधी,
नाचणी पिकांचे बियाणे मिनीकीटचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते वाटप,
राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य उपअभियान ” श्री अन्न” अंतर्गत नाचणी पिकांचे मिनीकीट बियाणे वाटप कार्यक्रम मौजे देहरे येथे पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना बियाण्यांचे व पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक ड्रमचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी जव्हार जयराम आढळ,मंडळ कृषी अधिकारी, अशोक बागुल,उप कृषी अधिकारी अनिल डाबेराव, सहाय्यक कृषी अधिकारी भरत कोरडे तसेच राधाकृष्ण महिला बचतगटाच्या प्रमुख आदिवासी समाजसेविका मीरा महाले,इतर महिला सदस्या व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाचणी हे अन्नधान्य पोषणमूल्यांनी भरलेले असून, अल्प पावसाळी परिस्थितीतही चांगले उत्पादन देणारे पीक आहे.या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना पोषणयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पिकांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी ” श्री अन्न,” उपअभियानाचे महत्व पटवून देत नाचणी लागवडीसाठी योग्य तंत्रज्ञान,प्रक्रिया व विपणन यावर मार्गदर्शन केले.आ.भोये यांनी आपल्या मनोगतामध्ये या उपक्रमाचा ग्रामीण आणि आदिवासी भागातील पोषण सुरक्षेसाठी होणारा उपयोग अधोरेखित केला.
हा उपक्रम कृषी विभागाच्या माध्यमातून भविष्यातही सातत्याने राबवण्यात येणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

