वसंत भोईर,वाडा
बैलजोडीला लाखाचा भाव,
पावसाळ्याच्या तोंडावर अनेक शेतकरी नवीन बैल जोडी खरेदी करतात.वाडा तालुक्यात जनावरांचा बाजार भरत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेजारी असलेल्या जिल्ह्यातील बाजारातून बैलजोडी खरेदी करावी लागते.
यंदा मे महिन्याच्या अखेरीस समाधानकारक पाउस झाल्यानंतर खरिपाच्या तोंडावर जनावरांचा बाजार सुरू झाला आहे.शेतकरी सध्या या बाजारात शेतकरी जनावरांची खरेदी करू लागले आहेत.या बाजारात खुल्या पद्धतीने गावा-गावात जनावरांची खरेदी विक्री होत आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतीचे वेड आहे,त्यासाठी बैलांची मोठ्याप्रमाणात खरेदी होत असते.शर्यतीसाठी मिळणाऱ्या बैलांची किंमत ४ ते ५ लाख रु.पर्यंत असते.शर्यतीसाठी अनेक जण बैलासाठी वारेमाप खर्च करत असतात.
शेती मशागतीसाठी यांत्रिकीचा वापर वाढला असला,तरी अंतर मशागतीसाठी बैलजोडी शिवाय शेतकऱ्यांना अन्य पर्याय नसतो.पावसाळ्यात अनेक शिवारातील शेत मशागतीसाठी बैल जोडीचाच आधार शेतकऱ्यांना घ्यावा लागत असतो.बदलत्या परिस्थितीमध्ये लाख रु.पर्यंत रक्कम सर्जा- राजाच्या खरेदीसाठी मोजावी लागत आहे.
वाढत्या महागाईची झळ सर्वच क्षेत्रांना बसत आहे. अशातच मजुरी,डिझेल, वाहनाच्या साहित्याचे दर वाढल्यामुळे खर्च वाढत आहे. त्यामुळे मशागतीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.मोठ्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर फायदेशीर ठरत आहे. शेतामध्ये मशागत करूनही पीक हाती लागेल की नाही याची शाश्वती नसते.
अंतर मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांकडून चांगल्या बैल जोडीचा शोध घेत खरेदी करण्यावर भर दिला जातो.यात शारीरिक क्षमता अधिक असणाऱ्या गोंडस दिसणाऱ्या बैलजोडीला शेतकरी अधिक पसंती देत आहेत.
पावसाळ्यात जनावरांना मुबलक चारा उपलब्ध होतो. त्यामुळे पशुपालक, शेतकऱ्यांना चाऱ्याची वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता नसते.परिणामी, परिणामी दुखत्या जनावरांना मागणी वाढली आहे.
गावरान बैल जोडी – ४० ते ९० हजार रु.
हायब्रीड बैल जोडी – ५० ते ८० हजार रु.
खिल्लारी बैल जोडी – ९० ते ९५ हजार रु.
दुभती गाय – ३५ ते ५० हजार रु.
दुभती म्हैस – ६० ते ८० हजार रु.
यावर्षी बैलजोडीचे भाव गगनाला पोहोचले असताना चाऱ्याचे दरही भरमसाठ वाढले आहेत.त्यामुळे यंदा शेतकरीवर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.

