वसंत भोईर,वाडा
कुडूस मध्ये वार्षिक बाजाराला सुरुवात…
सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या कुडूस येथील वार्षिक बाजार भाव काल सायंकाळी निश्चित करण्यात आले असून आजपासून बाजाराला सुरवात होणार आहे.या बाजारात विकण्यासाठी आलेल्या मालाचे भाव निश्चित करण्यात आले आहेत.
या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार हळद- २३० रू. किलो,धने-२५०,राई-१०० रु. किलो, मेथी-१००,जिरे-३००, खोबरे – २७५, ओवा-२३०,मोठा कांदा-१५ रु. लहान कांदा-१२ राजीने-२४०,सफेद लसूण-१००,लाल लसूण-१९०,चिंच-१६०,शेपू- २२० असे भाव निश्चित करण्यात आले आहेत.
ठरलेल्या बाजारभावापेक्षा जास्त दराने माल विकत घेऊ नये,असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वाडा,भिंवडी, शहापूर,मुरबाड,जव्हार, डहाणू ,विक्रमगड,वसई,पालघर,ठाणे,नवीमुंबई,पनवेल आदी ठिकाणांहून शेतकरी पावसाळ्यात लागणा-या वस्तूंची बेगमी करून ठेवण्यासाठी या बाजारात येत असतात.
शेतक-यांना लागणा-या वस्तू सहज विकत घेता याव्यात, यासाठी हा वार्षिक बाजार येथे शंभर वर्षांपासून भरत असतो. या बाजारात नाशिक, इगतपुरी,घोटी,लासलगाव, सिन्नर, येथील व्यापारी मसाल्याचे पदार्थ,कांदा, बटाटे,लसूण,तंबाखू,घोंगडी, कडधान्ये आदी वस्तू विकण्यासाठी घेऊन येत असतात.वार्षिक बाजारात विक्रीस आणलेल्या वस्तू या तात्पुरत्या स्वरूपातील तंबू उभारून वस्तू विकण्यात येत असतात.पाऊस पडला की या वस्तूंची मोठी नासाडी होत असते.हा वार्षिक बाजार मे महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात न भरवता तो पहील्या आठवड्यात भरवण्यात यावा,अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
या बाजारातील वस्तूंचे भाव कुडूस व्यापारी मंडळ,परिसरातील ग्रामस्थ,कुडूस ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व बाजार समिती यांनी निश्चित केले आहेत.
वाडा तालुक्यातील कुडूसच्या वार्षिक बाजाराला स्वातंत्र्यपूर्वचा इतिहास असून ब्रिटिश राजवटीमध्ये सुरू झालेला हा बाजार आजतागायत सुरू आहे.या बाजारात येणारे ग्राहक व व्यापाऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी,कचरा निर्मूलन, शौचालय,वाहनतळाच्या व्यवस्थेचा अभाव असल्याने ग्राहक व व्यापारी सध्या नाराजी व्यक्त करत आहेत.

