मनिष धानू,डहाणू
महाराष्ट्र दिनी ५ लाख सीड बोल्स निर्मितीचा संकल्प,
महाराष्ट्र दिनानिमित्त ” पर्यावरण वाचवा,” वसुंधरा सजवा,” या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात नवीन प्रयोगाला सुरूवात झाली आहे.या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते,खासदार डॉ.हेमंत सवरा,जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,तसेच इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.विजेत्यांना प्रशस्तीपत्रासह ” सीड बॉलचा डबा,” देऊन गौरवण्यात आले.
यावेळी शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर,संगीता भागवत तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये चर्चेत येणारे नाव म्हणजे ” सीडबॉल मॅन,” दीपक देसले यांचे.जिल्हा परिषद शाळा लिलकपाडा, कोसबाड ( ता. डहाणू ) येथे कार्यरत असलेले हे पर्यावरणप्रेमी शिक्षक गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने बीज गोळ्यांची निर्मिती करत आहेत.यंदा त्यांनी तब्बल ५ लाख सीड बॉल निर्मितीचा संकल्प केला आहे.
त्यांच्या पुढाकाराने सीड बॉल महोत्सव ४.० अंतर्गत यंदा राज्यभरातील १३ जिल्ह्यांत – लातूर,सांगली,सातारा, कोल्हापूर,पुणे,अहिल्यानगर, रायगड,नवी मुंबई,अमरावती, अकोला,नांदेड,कोपरगाव आदी ठिकाणी बिया पाठवण्यात आल्या आहेत.या बिया विद्यार्थ्यांच्या हातून शेकडो शाळांमध्ये सीड बॉलमध्ये रूपांतरित होणार आहेत.
या उपक्रमाची सुरुवात टोकेपाडा,घोलवड येथे झाली होती.पहिल्या वर्षी १० हजार, दुसऱ्या वर्षी २३ हजार,तर तिसऱ्या वर्षी डहाणू,तलासरी, पालघर तालुक्यातील १७ पर्यावरणप्रेमी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १ हजार ८०० विद्यार्थ्यांनी १ लाख १७ हजार सीड बॉलस तयार करण्यात आले आहेत.
लिलकपाडा कोसबाड शाळेतील ४६ विद्यार्थ्यांनी केवळ चार दिवसांत ४४ हजार सीड बॉल्स तयार करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.या उपक्रमात ” आनंददायी शनिवार’,” व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.
बियांचे संकलन हे अत्यंत सूक्ष्मपणे करण्यात आले. लिलकपाडा शाळेतील मुलांनी बेहडा,आपटा,बहावा,चिंच, लाजरा,रिठा,बेल इ.बिया गोळा केल्या.शिवण, रक्तचंदन,ढोरगुंज,गुंज,खैर, बांबू,चिलार,सीताफळ, कोसुंब,करंज,अभय,बिबवा, विलायती चिंच,कांडोळ, आकेशा इ.बिया वडेश्वर महादेव ट्रस्ट बडोदा येथील अवधूत नगरकर आणि वैशाली रा. पाटील यांच्याकडून देणगी स्वरूपात मिळाल्या. परिणामी ३०-३२ प्रकारांच्या बियांचा समावेश असलेली एक भव्य ‘सीड बँक’ उभी राहिली.
या कामात यामिनी करबट, ग्रामस्थ,पालक व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले.
या मोहिमेत अनेक शाळांनी आपले योगदान दिले आहे. सूर्यनगर हायस्कूलचे अंभिरे, वाघाडी हायस्कूलचे सोनवणे व संतोष अंकारम,बोर्डी येथील स्मिता ठाकूर,चिंबवे ब्राह्मण येथील छाया पाटील,पंकज नरवडे,शशिकांत ईशी, उल्हास देसले,अमोल तिजारे,ज्ञानेश्वर सरक,बिर्जे,पंकज पाटील ( भिनारी ),अर्चना चौधरी, धुमाळ,साधना भानुशाली ( वाडा ) यांचा विशेष उल्लेखनीय सहभाग आहे.

