संजय लांडगे,वाडा
आबिटघर परिसर पांघरणार हिरवाईचा शालू,
ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे यांच्या नेतृत्वाखाली अबिटघर ग्रामपंचायत नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विविध समाजोपयोगी संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करत असते.याचाच एक भाग म्हणून मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या मासिक सभेत आबिटघर गावाचा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांनी गाव आणि परिसरात ढासळणाऱ्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी परिसरातील शेकडो एकर जंगलात झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करावे.तसेच हा प्रकल्प राबवताना ग्रामपंचायत हद्दीतील उद्योजकांचे सहकार्य घेऊन त्यांचा सीएसआर फंड व गरजेनुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीचा उपयोग करावा असा ठराव मांडला.त्यास सदस्य कुलदीप पाटील यांनी अनुमोदन दिले तर सरपंच साक्षी संतोष साठे, उपसरपंच सुप्रिया पाटील, सदस्य धनश्री पाटील, स्मिता चिमडा,कल्याणी साठे,भावना रायात,निखिल पाटील, कल्पेश आमले,मनिषा मुकणे यांनी या ठरावाला पाठींबा दिला.
वृक्षलागवडीसाठी फॉरेस्ट खात्याची जमीन मिळवण्याकामी चर्चा करण्यासाठी जव्हार उपविभागीय वनसंरक्षक ( डी.सी.एफ. ) सुफीन शेख यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यांनी सदर प्रकल्पासाठी वनखात्याचे संपूर्ण सहकार्य मिळेल,असे स्पष्ट केले व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना याकामी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आदेश दिले.
या भेटीदरम्यान सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया पाटील,सदस्या धनश्री दयानंद पाटील व ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील उपस्थित होते.

