शशिकांत ठाकूर,कासा
डहाणूत दरवर्षी उन्हाळ्यात ताडगोळेना मोठी मागणी,
डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ताडगोळे आले असून यामध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची विक्री सुरू झाली आहे.महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.याठिकाणी गुजरात आणि मुंबई हून येणारे भाविक व ग्राहकांचा ताडगोळे खरेदी करण्याकडे कल अधिक आहे.या विक्रीतून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे.
ताडगोळे या फळाला विशेष महत्त्व असून उन्हाळी फळ असलेल्या ताडगोळ्याला “आईस ऍपल,” असे म्हंटले जाते.पांढरेशुभ्र फळ,रसदार गर आणि चवीला गोड असलेले ताडगोळे ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचे फळ आहे. उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे सेवन शरीरासाठी लाभदायक असल्याने सध्या फळे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. डहाणू,तलासरी तालुक्यांमध्ये ताडगोळ्यांची विक्री सध्या जोरात करण्यात येत आहे. सध्या बाजारात ८० ते १२० रु.डझन भावाने ताडगोळ्यांची विक्री सुरू आहे.
ताडाच्या झाडावर उन्हाळ्याच्या हंगामात येणारी ही फळे चवीला गोड असून समुद्रकिनारपट्टी भागामध्ये याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते.डहाणू तालुक्यात ताडाची ( माड ) झाडे मुबलक प्रमाणात आहेत.डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिर परिसरात सध्या ८० ते १२० रु.डझन अशी फळांची विक्री सुरू असून इतर ठिकाणी फळे १६० ते २०० रुपये डझन प्रमाणे विकली जात असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.
दरम्यान ताडगोळे सोलून विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना
अंगमेहनत करावी लागते.उंच ताडाच्या उंच झाडावर चढून फळे पाडावी लागतात.फळे खाली पडल्यानंतर त्यांची सोलून विक्री केली जाते. महालक्ष्मी मंदिर परिसरात गुजरात मधील भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे येथे ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे. सध्या महालक्ष्मी मंदिर परिसरात १० ते १२ दुकानदार ताडगोळे विक्री करत आहेत. महालक्ष्मी जत्रेत २५ ते ३० दुकानदार ताडगोळे विक्रीसाठी दाखल होतात. ताडगोळे विक्रीतून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.

