सचिन परब, विरार,
विरार येथे ” जुळल्या सुरेल तारा,” हा शास्त्रीय संगीत वाद्यवादन कार्यक्रम संपन्न,
सृजन विरार या संस्थेतर्फे विवा महाविद्यालयाच्या विजयानंद पाटील रंगायतन येथे ” जुळल्या सुरेल तारा,” हा शास्त्रीय संगीत वाद्यवादन मैफल पार पडली.या कार्यक्रमाला संगीतप्रेमी नागरिकांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात पं.शिवकुमार शर्मा यांचे शिष्य पुणे येथील डॉ.शंतनु गोखले यांच्या संतूर वादनाने रसिक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता. सुरुवातीस वाद्याची ओळख त्यात कालानुरूप झालेले बदल,अशी उपयुक्त माहिती त्यांनी दिली.प्रथम राग वाचस्पती सादर करून त्यांनी हिमाचल प्रदेशात लोकप्रिय असलेल्या पहाडी रागातील एक धून सादर केली.
द्वितीय सत्रात पं.डी.के दातार यांचे शिष्य राजन माशेलकर यांनी व्हायोलिन आणि उस्ताद मुन्नेखान व उस्ताद सरवर हुसैन यांचे शिष्य वसीम खान यांनी सारंगी या दोन वाद्यांची बहारदार जुगलबंदी सादर केली.सुरुवातीस राग बागेश्री सादर केली.त्यानंतर उत्तर भारतातील लोकसंगीत प्रकारातील चैती धून सादर केली.
या सर्व कलाकारांना पं.सुरेश तळवलकर यांचे शिष्य आशय कुलकर्णी यांनी तबल्याची उत्तम साथ केली.
कार्यक्रमाचे अतिशय मधुर ध्वनी संयोजन स्पंदन साऊंड – योगेश पटेल यांनी केले तर प्रकाश व्यवस्था महेश सापणे यांची होती.
वसई विरार परिसरात आजवरच्या इतिहासात सारंगी,संतूर या वाद्यांचे आणि व्हायोलिनसह तीनही वाद्यांचे एकत्रित सादरीकरण झाले नव्हते.
नाविन्यपूर्ण विषय आणि कल्पक विचारांचे आयोजन,या सोबत वक्तशीरपणाची ख्याती असलेल्या सृजन विरार,या संस्थेने त्यांच्या लौकिकाला साजेशी अशी मैफल घडवून ह पुन्हा एकदा रसिकांना मेजवानी दिली.
या मैफिलिस पंडित नरेंद्र कोठंबीकर,मधुसूदन आणि मनीषा आपटे,स्वरदा सोहनी, रोहिणी साने यांच्यासह वसई विरार परिसरातील संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच पुण्यातील मित्र फाऊंडेशनचे संस्थापक धनंजय गोखले,विरार मधील डॉ. प्रवीण क्षीरसागर,डॉ. विद्यानंद राऊत,विवा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्राजक्ता परांजपे यांच्यासह अनेक दर्दी रसिक उपस्थित होते.
सृजन विरार तर्फे संदीप फाटक,श्रद्धा प्रभु आणि मुग्धा फाटक यांनी नेहमीप्रमाणे कार्यक्रमाचे नेटके आयोजन करत प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली.

