वसंत भोईर,वाडा
चांबळे गावात ग्रामदेवतांची सोंगे व महिषासुर वध,ठरताहेत आकर्षण,
तालुक्यातील चांबळे गावात गेल्या अनेक वर्षापासून रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो.यंदा ” दिलेर डाकू,” हे लोकनाट्य सादर करण्यात आले.हनुमान प्रसादिक मंडळाने हे लोकनाट्य बसवले होते. त्याला गावातील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले.
आज सकाळी ७.०० वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत ग्रामदेवतेची सोंगे काढण्यात आली होती.
दरवर्षी होणाऱ्या रंगपंचमी उत्सवाला व त्यानिमित्ताने स्थानिक कलाकार सादर करीत असणाऱ्या नाटकाला शतकाची परंपरा आहे. रंगपंचमी पंचमी उत्सव व त्या निमित्ताने सादर केले जाणारे नाटक व ग्रामदेवतांची सोंगे गेल्या चार ते पाच पिढ्यांपासून अखंडपणे सुरू आहे.
दुसऱ्या दिवशी गावदेवी, वेताळ,वीरभद्र या ग्रामदेवतांची सोंगे काढण्यात येतात.यावेळी सादर होणाऱ्या महिषासुर वधाचे विशेष आकर्षण असते.शतकाची परंपरा असणाऱ्या रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने सादर होणारी नाटके व परंपरा अखंडित सुरू ठेवणे,हे चांबळे ग्रामस्थांचे वैशिष्ट्य आहे.तर ग्रामीण कला व संस्कृती जपण्यासाठी तरुणांचा असणारा सहभाग कौतुकाची बाब आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील या नाटकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात असंतोष प्रकट करण्यात येत असे.अत्यंत दर्जेदार व अभिनयाने सादर करण्यात येणाऱ्या या नाटकांनी गावाला वेगळा लौकिक मिळवून दिला होता.
वारणेचा वाघ,डाकू मानसिंग,बंडखोर,चंबळचा डाकू,येळकोट येळकोट जय मल्हार,फकीरा,रक्तसम्राट यासारखी नाटके त्याकाळी खूप गाजली.विशेष म्हणजे ही सर्व नाटके संगीत साधनासह व व्यावसायिक रंगभूमीवरील नामवंत स्त्री कलाकारांना या नाटकासाठी इतर भागातून पाचारण करण्यात येते.मात्र पुरुष कलाकार हे गावातीलच असावेत,हा पायंडा आज तागायत पाळण्यात येत असतो.

