वसंत भोईर,वाडा
आदिवासी विकास महामंडळाचा गलथान कारभार चव्हाटय़ावर,
वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळीच पैसा उपलब्ध होत नसल्यामुळे तीन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.भात दिल्यानंतर तीन दिवसात पैसे असा महामंडळाचा नियम आहे,मात्र हा नियम धाब्यावर बसवून तीन महिने उलटले तरी पैसांचा पत्ताच नाही.त्यामुळे शेतकऱ्यांत महामंडळाविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज तहसीलदारांना निवेदन देऊन येत्या चार पाच दिवसात पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून तालुक्यात भातखरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.गो-हे,पोशेरी, कोनसई,परळी,सारशी,खैरे- आंबिवली,मानिवली,गुहिर या आठ केंद्रांचा त्यामध्ये समावेश आहे.यंदा ज्या शेतकऱ्यांनी ई- पिक पाणी केली आहे.अशा शेतकऱ्यांचे भात खरेदी-विक्री केंद्रावर घेण्यात आले आहे. ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत, त्यांचे भात स्विकारण्यात आले नाही.शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरही तीन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे.अद्याप भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांना खेटे मारावे लागत आहेत.या महामंडळाच्या अनागोंदी कारभारा विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे करोडोंच्या घरात शेतकऱ्यांचे पैसे अडकल्याने येथील शेतकरी संकटात सापडले आहेत.सेवा सहकारी सोसायट्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा मार्च अखेर समीप आला आहे.तसेच लग्नाचा हंगाम सुरू झाला असून करणार तरी कशी असा मोठा आर्थिक पेज त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.केंद्र चालकांकडे या संदर्भात चौकशी केली असता काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचे आयडी लाॅक केली आहेत.
सर्वच कागदपत्रांची खातरजमा करून घेतली असताना तांत्रिक अडचण तरी कोणती असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.महामंडळाच्या या अनागोंदी कारभारामुळे बळीराजा मात्र मेटाकुटीला आला आहे.लवकरात लवकर शेतकऱ्यांना भात विक्रीचे पैसे मिळाले नाहीत,तर शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.येत्या चार पाच दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे, अरूण पाटील,प्रकाश केणे, तालुकाप्रमुख निलेश पाटील, कांतीलाल देशमुख,प्रमोद घोलप या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.
आदिवासी विकास महामंडळ मोखाडा विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या असून त्याचे निराकरण करण्याचे काम सुरू असून लवकरच शेतकऱ्यांचे पैसे मिळतील,अशी माहिती त्यांनी दिली.

