वसंत भोईर,वाडा,
आदिवासी मुलींसाठी ज्युडो,कराटे व जीवन कौशल्य प्रशिक्षण – एक महत्त्वपूर्ण उपक्रम
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील मुलींना आत्मसंरक्षण तसेच कौशल्ये विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागपालघर यांच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक आदिवासी विकास योजनेअंतर्गत जुडो कराटे आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये प्रत्येकी ४० मुलींना जुडो व कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.कै.दिगंबरराव पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा,आंबिस्ते येथे भेट देऊन जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद,पालघर,प्रवीण भावसार यांनी आढावा घेतला. त्यांच्यासोबत बालविकास प्रकल्प अधिकारी,वाडा व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.
प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत विलास जाधव आणि माध्यमिक मुख्याध्यापक दत्तात्रेय गोपाल दाते यांनी कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित केले.
शिवनाथ पाटील प्रशिक्षक, यांनी उपस्थित मुलींना जुडो कराटेच्या विविध कवायती आणि प्रात्यक्षिके करून दाखवले,ज्यामुळे विद्यार्थिनींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.
उपस्थित मुलींसोबत संवाद साधताना त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे स्पष्टपणे जाणवले.त्यांनी या प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यात अशा प्रकारच्या प्रशिक्षणांची गरज असल्याचे सांगितले.
प्रवीण भावसार यांनी या उपक्रमाच्या गरजेवर भर देत विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणे,हे अत्यंत महत्त्वाचे आहे,असे सांगितले. त्यांनी शाळा व्यवस्थापनाने या उपक्रमात दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले व यापुढेही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यास प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले.
या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे आदिवासी भागातील मुलींमध्ये आत्मरक्षण व जीवन कौशल्ये विकसित होणार असून त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हा उपक्रम लाभदायक ठरणार आहे.

