अविनाश मढवी,नालासोपारा,
९ फेब्रू.रोजी नालासोपाऱ्यात फनस्ट्रीट संडे,
वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग व जागरुक नागरिक संस्था व नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रवि.९ फेब्रु.रोजी नालासोपारा पश्चिमेकडे फनस्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे.मोबाईल आणि संगणकाच्या युगात दिवसें दिवस मैदानी खेळाकडे लहान मुलांसह तरुणांचा कल कमी होताना दिसत आहे. नागरिकांना लहानपणी त्यांनी खेळलेल्या सर्व खेळाचा आनंद घेता यावा,त्यांच्यात खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी,यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने फनस्ट्रीट या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपारिक व इतर खेळात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहॆ.या फनस्ट्रीटच्या आयोजनामुळे वसई विरार शहरामधील नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व त्यांच्या मध्ये खेळांची तसेच विविध मैदानी खेळासह इतर खेळांची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या फनस्ट्रीटमध्ये बालपणीच्या सर्व खेळाचे साहित्य महापालिका विनामुल्य उपलब्ध करुन देणार आहे.खेळाबरोबर संगीत,चित्रकला,गायन,नृत्य असे इतर अन्य कलादेखील नागरिक,विद्यार्थी सादर करु शकतात.तसेच नागरिक स्वत: खेळाचे साहित्य आणून आपले खेळ खेळू शकणार आहेत.
खालील खेळांचा व कलांचा समावेश-
अरोबीक्स, मल्लखांब,जिमनास्टीक,पारंपारिक खेळ, कराटे,फुटबॉल,पॉवर योगा, स्केटींग,भजन,भोजपुरी संगीत,करोके,तायक्वांडो , व्यायाम,मंगळागोर,आर्ट अन्ड क्राफ्ट,मेहंदी,झुम्बा,प्लॉवर मेकींग,इ-बाईक,कीड्स ड्रॉईंग, कॅलीग्राफी व इतर अनेक खेळांचा समावेश आहे.
- ठिकाण – फनस्ट्रीट हा कार्यक्रम रवि.९ फेब्रू.सकाळी प्रभाग समिती ( ई ) कार्यालय हद्दीतील पंचमुखी हनुमान मंदिर ते लक्ष्मीबेन छेडा नगर सर्कल,नालासोपारा पश्चिम येथे आयोजित करण्यात आला असून फनस्ट्रीट हा कार्यक्रम जागरुक नागरिक संस्था,वसई व नारी प्रेरणा प्रतिष्ठान,नालासोपारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
सर्वांसाठी फनस्ट्रीट-
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क आकारण्यात येणार नसून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे.त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी महानगरपालिकेची विशेष परिवहन सेवा-
कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी सकाळी ५.४५ वाजता विरार पूर्व,कोपरी नाका येथून साईनाथ नगर -मनवेलपाडा- मनवेल पाडा तलाव मार्ग- तुळींज मार्ग- नालासोपारा पश्चिम लक्ष्मीबेन छेडा तसेच सकाळी ५.४५ वाजता विरार पश्चिम गोकूळ टाऊनशीप मार्ग- ग्लोबल सिटी- बोळींज नाका- चक्रेश्वर तलाव मार्ग- नालासोपारा पश्चिम लक्ष्मीबेन छेडा,अशा दोन विशेष परिवहन सशुल्क बस सेवा महानगरपालिकेतर्फे ठेवण्यात आली आहे.तसेच याच ठिकाणाहून पून्हा परतीसाठी देखील बस सेवा सकाळी ९.३० वाजता असणार आहे.
सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदाही रवि.१६ फेब्रु.२०२५ रोजी वसई येथे फनस्ट्रीटचे आयोजन करण्यात येणार आहे.या दोन्ही कार्यक्रमात नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

