दीपक मोहिते,
जिल्ह्यात शासकीय कृषी व मत्स्य महाविद्यालय सुरू होणार – माजी आ.राजेश पाटील,
पालघर जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात असलेले शासकीय कृषी आणि शासकीय मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी माजी आ.राजेश पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची २८ जाने.रोजी मंत्रालयात भेट घेतली.यावेळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य विनायक काशिद उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांसाठी संशोधन केंद्रे आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन कल्पना विकसित करण्यावर या चर्चेत विशेष भर देण्यात आला. वसईची प्रसिद्ध केळी,जुनी लाल केळी,सफेद वेलची,आणि मोगरा यांसारख्या पिकांसाठी विशेष संशोधन व मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्यावर चर्चा झाली.
शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी कृषी विद्यापीठातर्फे पालघर जिल्ह्यात कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि मार्गदर्शन शिबिरे राबवण्यात येणार आहेत.या उपक्रमांमुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी अधिक सक्षम,समृद्ध आणि आत्मनिर्भर होईल,आणि तरुण मुलांना कृषी व मत्स्य शेती,या विषयावर चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन शेती क्षेत्रात नक्कीच प्रगती करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत पालघर जिल्ह्याच्या एकूण कृषी व मत्स्य शेती व्यवसायाच्या विकासासाठी रचनात्मक उपाययोजना राबवण्यासंदर्भात सखोल चर्चा झाली.लवकरच या विषयावर पुढील पावले उचलण्यात येणार असून,जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

