सुशीला फातरपेकर,नालासोपारा
नालासोपारा येथे ९ फेब्रु.रोजी फनस्ट्रीटचे आयोजन,
मोबाईल आणि संगणकाच्या युगात दिवसें दिवस मैदानी खेळाकडे लहान मुलांसह तरुणांचा कल कमी होताना दिसत आहे.यासाठी नागरिकांना बालपणातील त्यांनी खेळलेल्या सर्व खेळाचा आनंद घेता यावा,त्यांच्यात खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने ” फनस्ट्रीट,” या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपारिक व इतर खेळात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत असून या फनस्ट्रीटच्या आयोजनामुळे वसई विरार शहरामधील नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व त्यांच्या मध्ये खेळांची तसेच विविध मैदानी खेळासह इतर खेळांची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या फनस्ट्रीटमध्ये बालपणीच्या सर्व खेळाचे साहित्य महापालिका विनामुल्य उपलब्ध करुन देणार आहे.खेळासोबत संगीत,चित्रकला,गायन,नृत्य असे इतर अन्य कला देखील नागरिक,विद्यार्थी सादर करु शकतात.तसेच नागरिक स्वत:हून देखील खेळाचे साहित्य आणून आपले खेळ खेळू शकतील.फनस्ट्रीटच्या ठिकाणी नागरिकांच्या येण्याजाण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेची विशेष परिवहन सेवा देखील असणार आहे.त्याची माहिती स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केली करण्यात येणार आहॆ.
फनस्ट्रीट हा कार्यक्रम रविवार ९ फेब्रू.सकाळी ६.३० ते ०९.३० वाजेपर्यंत प्रभाग समिती ( ई ) कार्यालय हद्दीतील पंचमुखी हनुमान मंदिर ते लक्ष्मीबेन छेडा नगर सर्कल,नालासोपारा प.येथे आयोजित केला असून फनस्ट्रीट हा कार्यक्रम जागरुक नागरिक संस्था, वसई व नारी प्रेरणा प्रतिष्ठान, नालासोपारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नसून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे.त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

