अनंत भोईर,पालघर,
३० जाने.ते १ फेब्रु.दरम्यान ” पालघर सरस,” चे आयोजन,
पालघर राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद पालघर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर सरस २०२४ -२५ येत्या ३० जाने.ते १ फेब्रु.या काळात पार पडणार आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी व स्वयंसहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन दरवर्षी राबवण्यात येते.यावर्षीही आर्यन हायस्कूल मैदान,पालघर येथे ३० जाने.ते १ फेब्रु.या काळात ” सरस भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव,”संपन्न होणार आहे.
जिल्हाभरातील ४५ महिला गट या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार असून खानावळ आणि इतर वस्तूंची विक्री,असे याचे स्वरूप आहे.यामधे विविध प्रकारचे पापड,लोणचे, सरबत,वाळवणीचे पदार्थ, वारली हाटमधील विविध वस्तू,बांबू पासून बनवलेल्या वस्तू व इतर अनेक उत्पादनांचा समावेश यामध्ये असणार आहे,अशी माहिती
प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रूपाली सातपुते यांनी दिली.
प्रत्येक तालुक्यातील गटांनी ” सरस,”मध्ये सहभागी व्हावे, यासाठी तालुका स्तरावरून महिला गटांना आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पालघर मधील आणि जिल्हाभरातील जनतेने सरस मध्ये भेट देऊन महिला गटांकडील वस्तू खरेदी करून गटांना प्रोत्साहन द्यावे,तसेच जास्तीत जास्त गटांनी यामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे,सर्व समिती सभापती,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,यांनी केले आहे.

