संदीप जाधव,बोईसर
बोईसरचा कला – क्रीडा महोत्सव भावी पिढीसाठी प्रेरणादायी…
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठी औद्योगिक वसाहत,अशी तारापूर बोईसर एमआयडीसीची ओळख आहे. बोईसरमध्ये लहान मध्यम व मोठे असे मिळून एकूण दीड हजारांहून अधिक उद्योग आहेत.त्यामुळे देशाच्या विविध प्रांतातील कामगार व मजूर बोईसरला रोजगारासाठी येत असतात.अशा औद्योगिक नगरीत सांस्कृतिक उपक्रम सुरु करुन नव्या पिढीतील शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या सुप्त कलागुणांना संधी व उत्तम सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम महाराष्ट् स्पोर्टस एज्युकेशन अकादमी या संस्थेतर्फे करण्यात येत असते.यंदा या चार दिवसीय ” बोईसर कला क्रीडा महोत्सव ” उपक्रमात पालघर जिल्ह्यातील १६७ शाळांमधून १८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.ही संख्या पाहता आदिवासी बहुल जिल्ह्यातील सांस्कृतिक उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला असे स्पष्ट झाले आहे.
बोईसरचे ज्येष्ठ कामगार नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोईसरच्या टीमने हा उपक्रम यशस्वी करुन दाखवला.बोईसर कला क्रीडा महोत्सवाचे यंदा १९ वे यशस्वी वर्षे होते.मूळ सफाळे भागातील रामबाग परिसरातील संजय पाटील हे हरहुन्नरी कामगार नेते आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अथक परिश्रम व कष्टाच्या माध्यमातून बोईसर औद्योगिक वसाहतीत त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले आहे.
रुग्णवाहिका व अन्य सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी या भागात मोठे काम केले आहे.अर्थात संघटना व सामूहिक शक्तीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन त्यांनी समाजसेवेचा हा वसा पुढे चालवला आहे.वसई – विरार भागात बहुजन विकास आघाडीचे संस्थापक,लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या पुढाकाराने वसईत साडेतीन दशकांपासून होत असलेला कला – क्रीडा महोत्सवाचे शिवधनुष्य संजय यांनी यशस्विपणे संजय पाटील यांनी पेलले.बोईसरच्या शिक्षण क्षेत्रातील व्यासंगी व अभ्यासू व्यक्तीमत्व डॅरेल डिमेलो यांच्याशी सल्लामसलत केली व वसईच्या धर्तीवर बोईसरमध्ये कला – क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
अर्थात बोईसर कला – क्रीडा महोत्सव आयोजित करताना त्यांनी कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राची आवड असणाऱ्या समविचारी सहकारी व्यक्तींची टीम तयार केली.यात सर्व वयोगटातील सर्व जाती धर्माची विविध क्षेत्रातील मान्यवर व नव्या पिढीतील मंडळी सहभागी झाली.
करोना संकटानंतर हा कला – क्रीडा महोत्सव कायम सुरु राहील,यासाठी संजय आणि डिमेलो यांची मेहनत वाखाणण्याजोगी होती. या महोत्सवात ४८ कला – क्रीडा प्रकारात १५७ स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या.चार दिवसांच्या महोत्सवात सहभागी झालेल्यांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती.तर पिण्याच्या पाण्याची सुविधा निऑन फाऊंडेशनने उपलब्ध करुन दिली होती.या महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे खा.डॉ.हेमंत सावरा यांनी केली.या महोत्सवाला या भागातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.
प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील मंडळी व विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
खोदाराम बाग या मैदानात झालेल्या या महोत्सवास बोईसर भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.समूह नृत्यस्पर्धेत विराज इंटरनॅशनल स्कूल कुरगावने प्रथम पुरस्कार पटकावला. संजय पाटील व त्यांच्या टीमने बोईसर कला – क्रीडा महोत्सव यशस्वी करुन दाखवला.हा महोत्सव आता २० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

