राहुल इंटरनॅशनल स्कूलच्या युनिटी ब्लेज ई क्र्यूने उंचावले बोईसरचे नाव..!
बोईसर, संदीप जाधव
इन्फिनिटी मॉल,मालाड येथे झालेल्या १३ व्या इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत देशभरातील ६० नामांकित ग्रुप्सनी आपल्या अप्रतिम सादरीकरणाने नृत्यकलेचा उत्सव साजरा केला.या स्पर्धेत आसाम, गुजरात,मध्य प्रदेश,महाराष्ट्र, पंजाब,राज्यांतील विद्यार्थ्यांनी हिप हॉप नृत्याच्या माध्यमातून आपले नृत्यकौशल्य सादर केले.
या स्पर्धेत बोईसरच्या राहुल इंटरनॅशनल स्कूलच्या युनिटी ब्लेज ई क्र्यूने दिमाखदार कामगिरी करत जेव्ही मेगा क्र्यू कॅटेगरीत अकरावा क्रमांक पटकावला.ग्रुपमधील क्रिश कल्पेश पाटील,राही वैभव पाटील,स्वामिनी चौधरी,आद्या पुरी, दृष्टी सिंह,सांची धोडी, शरण्या देशमुख,रिशी सिंह, विकास कुशवाह,आर्चीत मेश्राम आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
कोरिओग्राफर आदित्य तांबे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यात आत्मविश्वास आणि नृत्यकौशल्य निर्माण केले.त्यांच्या मेहनतीमुळेच ग्रुपला देशभरात ओळख मिळाली आहे.
“विद्यार्थ्यांनी एकजूट,कठोर परिश्रम,आणि नृत्यकलेची समर्पित भावना दाखवत बोईसरचे नाव देशपातळीवर उंचावले आहे.हा विजय शाळेसाठी आणि शहरासाठी अभिमानाचा आहे,” असे प्राचार्य मुकेश शर्मा यांनी सांगितले.
राहुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश येथील नृत्यकलेच्या प्रगतीचे प्रतीक आहे.युनिटी ब्लेज ई क्र्यूच्या गृपतर्फे सादर केलेल्या हिप हॉप शैलीच्या नृत्याने स्पर्धेला अधिक रंगत आणली आणि उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांवर विविध स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत असून,त्यांची कामगिरी पुढील डान्सची रुची बाळगणाऱ्या आणि या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रेरणादायक ठरणार आहे.

