पीडीटीएस मैदानावर फुटबॉल स्पर्धेचा थरार : स्पर्धेला शानदार सुरुवात,
बोईसर संदीप जाधव
बोईसरच्या पीडीटीएस मैदानावर फुटबॉलप्रेमींना आजपासून थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. हार्दिक फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ओपन फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन आज सकाळी बोईसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल १६ संघ सहभागी झाले आहेत.अनेक प्रख्यात खेळाडू आणि चमूचा सहभाग हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले आहे. पीडीटीएसच्या मैदानावर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ओपन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होत असल्याने बोईसरच्या क्रीडाविश्वाचे नाव सर्वत्र दुमदुमत आहे.
आज झालेल्या उद्घाटन सोहळ्याला आरती ड्रग्स कंपनीचे मालक उदय पाटील, पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि बोईसर ग्रामपंचायत उपसरपंच निलम संखे,सदस्य अतुल देसाई, भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष जितेंद्र संखे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यांपासून खेळाडूंनी प्रेक्षकांची मने जिंकली. थरारक चढाया,उत्कृष्ट बचाव आणि अप्रतिम गोल यांनी मैदानावरील फुटबॉलप्रेमीना मेजवानी दिली.
हार्दिक फाउंडेशनने अशा प्रकारचा आगळावेगळा उपक्रम हाती घेतल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक फुटबॉलपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि खेळाला प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
आगामी सामन्यांमध्ये प्रेक्षकांना अप्रतिम खेळाचा अनुभव घेता येणार असून, बोईसरच्या क्रीडाजगतात ही स्पर्धा नवोदित खेळाडूंना नवी ऊर्जा देणारी ठरणार आहॆ.

