वसंत भोईर,वाडा,
वाडा तालुक्यात बहरली ताग पिकाची शेती,
रब्बी हंगामात अधिकाधिक उत्पादनासाठी वाडा तालुक्यातील शेतकरी विविध रब्बी पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रयोग करीत आहेत.यावर्षी तालुक्यातील गो-हे विभागातील पन्नास हुन अधिक शेतकऱ्यांनी ताग पिकाची पेरणी केली आहे. सध्या ही तागाची शेती चांगलीच बहरली आहे.
वाडा तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात कलिंगड,टरबुज,फुलशेती या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करुन चांगले उत्पादन घेत आहेत.मात्र ही पिके अधिक खर्चिक असल्याने कमी खर्चात व कुठल्याही प्रकारच्या खतांची तसेच पाण्याची आवश्यकता नसलेल्या हरभरा,वाल मुग, तिळ, तुर ही नगदी पिके घेत आहेत.येथील शेतकऱ्यांनी अत्यंत कमी खर्च व अधिक उत्पादन देणारे ताग,या पिकाची त्यामध्ये भर घातली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार,विक्रमगड या तालुक्यांतील शेतकऱ्यांबरोबर वाडा तालुक्यातील गो-हे विभागातील साई देवळी,मांडे, भोपिवली,खरिवली,वावेघर आदी दहा ते बारा गावांतील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी दिडशे एकर क्षेत्रावर ताग पिकाची पेरणी केली आहे.सध्या हे पीक फुलोऱ्यात आले असून पिवळ्या धमक फुलांनी सोन्यावानी शेती बहरली आहे.
चौकट
१ ) कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक,
ताग पिकाचे बियाणे १०० ते १२५ रू.प्रति किलो दराने उपलब्ध होते.वाल,मुग या पिकाप्रमाणे त्यांच्या बियाणाची पेरणी केली जाते. पेरणीपुर्वी अथवा पेरणी नंतर कुठल्याही प्रकारच्या खताची तसेच पाण्याचीही आवश्यकता या पिकाला नसते.साडेतीन महिन्यात हे पीक पुर्ण तयार होऊन काढणीस तयार होते.
२ ) तागाच्या बीपासुन तेल तयार केले जाते.या बीसाठी गुजरातमधुन मोठी मागणी आहे.येथील व्यापारी खरेदीसाठी या भागात येत असतात.
शेतकऱ्यांनी मागणी केल्यास कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तागाचे बियाणे पुरवले जाते.मात्र या बियाणापासुन तयार होणारी तागाची रोपे हिरवळीचे खत म्हणून शेतकऱ्यांनी वापर केल्यास एक चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत तयार होते.
३ )
तागाच्या शेतीतून प्रति एकर ९ ते १० क्विंटल उत्पादन ( बी ) मिळते.या बियांना सहा ते साडेसहा हजार रु.प्रतिक्विंटल दर मिळतोय. अत्यंत कमी खर्चाचे व प्रति एकरी ६५ हजार रु. हमखास उत्पादन देणारे हे पीक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.
कोट
गेल्यावर्षी केलेल्या ताग शेतीच्या प्रयोगात कमी खर्चात चांगले उत्पादन मिळाल्याने यावर्षी रब्बी हंगामात चार एकरमध्ये तागाची पेरणी केली आहे.
जनार्दन पाटील – शेतकरी, साई देवळी,ता.वाडा,
चौकट-
तागाच्या खोडापासून गोणी,पिशव्या,पायपुसणी, गोणपाटे बनवली जातात. तसेच ताग हे हिरवलीचे खत म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याने तागाची अधिकाधिक लागवड करण्यासाठी तागाच्या बियाणाला खुपच मागणी वाढु लागली आहे.
तागाचे बिजोत्पादन करण्यासाठी तागाची लागवड वाडा तालुक्यात होत असुन यावर्षी वाडा तालुक्यात तागाच्या बियाणाचे दिडशे मेट्रीक टन उत्पादन होईल,असे मानिवली येथील ताग उत्पादक शेतकरी पुंडलिक पाटील यांनी सांगितले.

