वसंत भोईर,वाडा,
दुधाला अनुदान मिळालं ; शेतकऱ्यांचे घर आनंदात न्हालं !
सहकारी दूध संघ, खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर पाच रु.तर नंतरच्या कालावधीत सात रु.चे अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागातर्फे राबवण्यात येत आहे.या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यात मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ-उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ,खाजगी प्रकल्पांना गाईचे दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रु.अनुदान देण्याचा निर्णय ५ जाने.रोजी घेण्यात आला होता.त्यानंतर १ ऑक्टो.२०२४ पासून दोन रुपयांची वाढ करून आता सात रु. प्रति लिटर अनुदान दिले जात आहे.
खाजगी दूध प्रकल्पांना ३.५ फॅक्ट/८ पॉईंट पाच एस एन.एफ.गुणमानाच्या दुधासाठी एक ऑक्टो.२०२४ पासून प्रति लिटर २८ रु.दर निश्चित केला आहे.तर शेतकऱ्यांना शासनामतर्फे सात रु.प्रति लिटर थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत.
राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रु.चे अनुदान संबंधितांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे.
राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रु.ऐवजी सात रु. अनुदानाचा निर्णय सप्टें. महिन्यात घेण्यात आला होता. मात्र,आता ३५ रु.दर कायम ठेवण्यात आला होता.
कर्नाटक,गोवा,मध्य प्रदेश,तेलंगणा व राजस्थानमध्ये म्हशीच्या दुधालाही अनुदान दिले जाते.

