सुरेश काटे,तलासरी,
” मोबाईलकडून मैदानाकडे, ” अभियानाला युवकांची साथ,
यशराज रिसर्च फाउंडेशनतर्फे अणवीर गावातील युवकांसाठी
मोबाईलकडून मैदानाकडे अभियान राबवण्यात येत असून या अभियानाला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.अणवीर प्रीमियर लीग ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आज या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी तलासरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत देवरे,तलासरी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी रत्नाकर अंबात,सावरोली अणवीर गावचे उपसरपंच जयवंत खुलात आणि यशराज रिसर्च फाउंडेशनचे प्रोग्राम लीड नामदेव गुलदगड उपस्थित होते.
यशराज रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षी एप्रिल महिन्यात अणवीर गावातील युवकांसाठी व्हॉलिबॉल आणि क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते.या स्पर्धांचा उद्देश हा फक्त खेळापुरता मर्यादित नाही,तर खेळाच्या माध्यमातून गावातील तरुण शक्ती एकत्रित यावी,त्यांची एकमेकांशी ओळख निर्माण व्हावी, वेगवेगळ्या विषयांवर त्यांची चर्चा व्हावी,त्यांच्यात एकतेची भावना वाढावी आणि त्यांनी चर्चेतून शिक्षण व करीअरच्या नव्या संधी जाणून घ्याव्यात,असा उद्देश आहे.
युवकांनी स्पर्धेत हिरारीने सहभाग घ्यावा,त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून यशराज रिसर्च फाउंडेशनतर्फे प्रथम विजेत्या संघाला सात हजार एक रु.रोख,यशराज चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले जाते. तसेच द्वितीय विजेत्या संघाला पाच हजार एक रु. रोख,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, तृतीय संघाला तीन हजार एक रु.रोख सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि चतुर्थ विजेत्या संघाला दोन हजार एक रु.रोख,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले जाते,अशी माहिती संस्थेचे प्रोग्राम लीड नामदेव गुलदगड यांनी दिली.

