संजय लांडगे,वाडा
वाडा येथील मुलीच्या अपहरणाचा पोलीसांनी लावला छडा,
काल वाडा शहरातील संजय गांधी नगर येथून अपहरण झालेल्या मुलीच्या आईने वाडा पोलीस ठाण्यात आपली आठ वर्षाची मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद
दिली होती.तीच्या फिर्यादी वरून वाडा पोलिसांनी तात्काळ तपास करून करून आरोपी व मुलीला शोधून काढले.
वाड्यातील संजय गांधी नगर येथे तीच्या राहत्या घरासमोर संध्याकाळी खेळत असलेल्या मुलीला फुस लाऊन एका इसमाने पळवुन नेले होते.यासंबधी तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाडा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ठाण्यात बोलावुन त्यांना अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या.तसेच जनसंवाद अभियान अंतर्गत सर्व ग्रुपवर अपहरण झालेल्या मुलीचा फोटो व संशयित इसमाचे वर्णन सर्वत्र पाठवून शोध घेण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन उपविभागीय पोलीस अधिकारी,यांनी वाडा पोलीस ठाण्याला भेट दिली व वाडा पोलिसांच्या दिमतीला अतिरीक्त कुमक मागवली.
मुलगी ज्या परिसरामध्ये खेळत होती त्या परिसरातील दुकानदार,नागरीकांकडे असलेले सी.सी.टि.व्ही.कॅमेरे याची तपासणी करुन मुलीचा शोध घेत असताना एका लहान मुलीने त्या इसमाचे नाव डेव्हीड असल्याचे सांगितले. नंतर व्हिडीओ सी.सी.टि.व्ही. प्राप्त होताच सदर इसम हा देसई येथे राहणारा गुरुनाथ ऊर्फ डेव्हीड महादु मुकणे असल्याचे लोकांनी ओळखले. त्याला दारु पिण्याचे व्यसन असुन तो गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे लोकांनी सांगितले. सदर इसम मुलीला घेवुन एनशेत गावाकडे जातांना सी.सी.टि.व्ही.कैमेऱ्यांमध्ये दिसल्यानंतर ऐनशेत गावातील जनसंवाद अभियान ग्रुप मधील सदस्यांना माहीती देण्यात आली.त्यांना सोबत घेऊन पोलीस एनशेत गावात परिसरात शोध घेत असता पहाटे ५.०० च्या सुमारास हा इसम मुलीला सोबत घेवुन शास्त्रीनगर परिसरामधुन लपत छपत जातांना दिसुन आला. पोलीसांनी त्याच्यावर झडप घालुन त्याला ताब्यात घेतले. तसेच मुलीची सुटका केली.सदर घटनेबाबत वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.सदर कारवाईमध्ये वाडा पोलीस ठाण्याच्या दहा ते बारा पोलिसांच्या पथकाने अत्यंत जलदगतीने हालचाल करून आरोपीला जेरबंद केले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

