बोईसर प्रतिनिधी,
चुकून झाडलेल्या गोळीने साथीदाराचा बळी ; आठ जण अटकेत ,दोन जण फरार,
पालघर तालुक्यातील बोरशेती जंगलात अवैध शिकारीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका शिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
२९ जाने.रोजी पहाटे, रानडुकराच्या शिकारीसाठी जंगलात गेलेल्या टोळीतील एका सदस्याच्या बंदुकीतून चुकून झाडलेल्या गोळीने रमेश वरठा (वय ६० रा. बोरशेती ) यांचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर त्यांचा मृतदेह झुडुपांत लपवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र,पोलिसांच्या तपासातून ही घटना उघडकीस आली असून,या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
२८ जाने.रोजी आठ ते दहा जणांनी बोरशेती जंगलातील आंब्याच्या पाणी भागात रानडुकराच्या शिकारीचे नियोजन केले होते. शिकाऱ्यांनी बंदुका घेऊन डोंगराच्या कड्यावर आणि झाडांवर ठाण मांडले होते.२९ जाने.रोजी पहाटे पाचच्या सुमारास हालचाल झाल्याने एका शिकाऱ्याने गोळी झाडली.मात्र,ही गोळी प्राण्याऐवजी त्यांच्या साथीदार रमेश वरठा यांना लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर घाबरलेल्या शिकाऱ्यांनी मृतदेह जंगलातील झुडुपात लपवला.२९ जाने.पासून रमेश वरठा बेपत्ता असल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. अखेर २ फेब्रु.रोजी मनोर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली.
मिसिंग तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर हाडळ (वय २८,रा. केळवा ) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने सर्व कबुली दिली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी नंदकुमार वायडा, शांताराम भूतकडे आणि अन्य पाच जणांना अटक केली. तसेच,दोन आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींकडून दोन बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.
पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील जंगलांमध्ये हौसेखातर शिकार करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. यासाठी गावठी कट्ट्यांसह प्राणघातक शस्त्रांचा वापर केला जातो. हीच शस्त्रे आता वन्यजीवांनंतर मनुष्यहत्येस कारणीभूत ठरत आहेत.

