संदीप जाधव,बोईसर
सरपंचांवर हल्ला : निषेधार्थ मनोर बाजारपेठ बंद,
मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने मनोर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मनोर बाजारपेठ पूर्णतः बंद करण्यात आली असून,अनुचित प्रकार घडू नये,यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत हद्दीत एका इमारतीत बिअर शॉप सुरू करण्यासाठी ग्रामसभेने दिलेल्या ना हरकत ठरावावरून हा वाद उफाळला.ग्रामपंचायतीने राठोड नावाच्या व्यक्तीला हा ठराव दिल्यामुळे अल्वी अल्ताफ रईस हा आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात आला व त्याने ” ठराव दिलाच कसा ? ” असा जाब विचारत ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर अल्वी रईस याने सरपंचांची कॉलर पकडली आणि मारहाण केली.वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपसरपंच चंपानेरकर यांनाही या झटापटीत धक्काबुक्की झाली.सदर घटनेनंतर ग्रामविकास अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी अल्वी रईस याला कार्यालयातून बाहेर काढले.
या प्रकरणी अल्वी अल्ताफ रईस याच्यावर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्ल्यानंतर सरपंच चेतन पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने मनोर पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले.या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी मनोर बाजारपेठ बंद केली.
परिसरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मनोर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीसानी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहॆ.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असताना मनोर ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

