जव्हार,प्रतिनिधी,
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन,
महाराष्ट्र शासन राज्य पेसा कक्ष पुणे,ग्रामविकास व पंचायतराज विभाग,जिल्हा परिषद पालघर,पंचायत समिती जव्हार पेसा कक्ष आणि ग्रामपंचायत कासटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज पेसा कायद्याच्या निर्मितीला २८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे आणि लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या हस्ते झाले.धरतीआबा भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उदघाटन सोहळा पार पडला.यावेळी पंचायत समिती जव्हारचे सहा.गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मनोहर उमतोल,कृषी अधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा व्यवस्थापक ( पेसा ) विकास पाटील,उपसरपंच त्रंबक रावते,तसेच ग्रामपंचायत सदस्य नितीन चौधरी,नितीन टोकरे,अशोक इंधन आदी उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान पेसा कोष समिती सदस्य व आदिवासी चित्रकारांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.सदर पेसा दिन जनजागृती मेळाव्याचे प्रस्ताविक ग्रामपंचायत अधिकारी किशोर सोनावणे यांनी केले व आतापर्यंत पेसा अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा सादर केला.जिल्हा व्यवस्थापक( पेसा ) विकास पाटील यांनी पेसा कायद्याची ओळख,त्याचे महत्व व ५% अबंध निधी अंतर्गत करावयाच्या कामांबाबत मार्गदर्शन केले.त्यानंतर सहा. गटविकास अधिकारी संदेश दुमाडा यांनी ग्रामसभेचे अधिकार व जबाबदाऱ्या तसेच पेसा अंतर्गत शासकीय योजनांविषयी माहिती दिली.लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांनी पेसा अंतर्गत पेसा ग्रामसभाच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली व अडचणींवर प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा विजयाताई लहारे यांनी पेसा कायद्याच्या माध्यमातून आदिवासी हक्क, वनहक्क कायदा,जल,जंगल, जमीन यांचे महत्व आणि स्थानिक विकास प्रकल्पांसाठी पेसा निधीचा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले.पेसा दिनानिमित्त आज जव्हार तालुक्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये प्रभात फेरी, जनजागृती मेळावे,आदिवासी संस्कृती आधारित सांस्कृतिक कार्यक्रम,पेसा कार्यशाळा, निबंध व रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सदस्य,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायतसदस्य ,पेसा कोष समिती सदस्य, तालुका व्यवस्थापक पेसा,तालूका पेसा समनव्यय,ग्रामपंचायत अधिकारी,पेसा मोबिलायझर, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,रोजगार सेवक,ग्रामपंचायत कर्मचारी,आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

