प्रतिनिधी,जव्हार,
नवीवाडी शाळेचा प्रेरणादायी स्वच्छता उपक्रम,
जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि नवीवाडी शाळेचे मुख्याध्यापक नितीन आहेर यांच्या पुढाकाराने ग्रामीण फर्स्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्थेच्या सहकार्याने नवीवाडी शाळेत विशेष स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे शास्त्रीय प्रशिक्षण मिळाले.शाळेत दररोज राबवला जाणारा “ हात धुवा,” उपक्रम अधिक प्रभावी बनवण्यासाठी संस्थेच्या परिवर्तन टीमने विशेष प्रयत्न केले.टीममधील अरुणा गायकवाड,निशा जाधव,आणि संध्या वाजे यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वच्छतेवर आधारित आकर्षक नाटिका सादर केली.या नाटिकेतून विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले.यानंतर, टीमने स्वतः हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि विद्यार्थ्यांकडूनही प्रात्यक्षिक करून घेतले.स्वच्छतेबाबत अधिक जागृतीसाठी लॅपटॉपवर स्वच्छतेशी निगडित व्हिडिओ दाखवण्यात आले.विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत दोन साबणांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित नाटिका सादर करून परिवर्तन टीमला सकारात्मक अनुभव दिला.या उपक्रमामुळे टीमने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले.संस्थेच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी प्रेरणा मिळाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून महिला कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.शाळेतील उपक्रमांमध्ये ग्रामपंचायत,पोलीस स्टेशन, महसूल कार्यालय,बाजारपेठ इ.ठिकाणी भेटीगाठी घेऊन विद्यार्थ्यांना विविध अनुभव देण्यात येत असतात.
मुख्याध्यापक नितीन आहेर यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ग्रामीण फर्स्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवन कौशल्ये शिकण्याची संधी मिळत आहे.

