जव्हार,प्रतिनिधी,
कनसरी दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन सोहळा संपन्न.
पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था,मुख्यालय जव्हार च्या वतीने दरवर्षीप्रमाणे कनसरी दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन नुकतेच संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण लोहार यांच्या विक्रमगड येथील निवासस्थानी संपन्न झाले.या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन राहुल धूम सेवानिवृत्त गटविकास अधिकारी, आणि पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ धर्मा डोके यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अर्जुन सुरूम, विक्रमगडचे माजी उपनगराध्यक्ष भालचंद्र मोरघा, डॉ. सदाशिव पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कनसरी दिनदर्शिका २०२५ हे एक विशेष प्रकाशन असून, ते आदिवासी संस्कृतीवर आधारित आहे.या दिनदर्शिकेत आदिवासींचे सण-उत्सव,वाद्य,नृत्य, रूढी-परंपरा, तसेच शासकीय योजना आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वाची माहिती यांचा समावेश आहे. याशिवाय,पेसा कायदा, जव्हार संस्थानाचा प्राचीन इतिहास यासंदर्भात सविस्तर लेखन करण्यात आले आहे.
दिनदर्शिकेची वैशिष्ट्ये:
आदिवासी समाजाच्या परंपरांचे जतन व संवर्धन,
शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे.
ही कनसरी दिनदर्शिका तयार करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ डोके,जेष्ठ सल्लागार विनायक शेळके, सजन खुताडे,उपाध्यक्ष लक्ष्मण लोहार,कार्याध्यक्ष नारायण शेंडे,सचिव मनोज कामडी,खजिनदार केशव महाला, तसेच सदस्य गोपाळ बोरसे,राजेंद्र राऊत,गणपत शेंडे,अनिल कोथे,यादव भोये, रमेश गुरव,सुरेश बांबरे, महिला सदस्य लक्ष्मीबाई भोये, सरस्वती नडगे-भोये, विमल गोविंद आणि इतर पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाच्या हक्क,अधिकार, आणि उन्नतीसाठी काम करत आहे.आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून,कनसरी दिनदर्शिकेच्या माध्यमातून या उद्दिष्टाला बळ दिले जाते.
कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी मौलिक मार्गदर्शन केले.सोहळ्याला जेष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी,सभासद, जाहीरातदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

