सुरेश काटे,तलासरी,
२४ डिसें.रोजी पेसा ग्रामपंचायतींमध्ये साजरा होणार ‘पेसा दिन’
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने २४ डिसें.हा दिवस ‘ पेसा दिन,’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी दिले आहेत.
पेसा कायद्याच्या निर्मितीला २४ डिसे.रोजी २८ वर्षे पूर्ण होत असल्याने पंचायती राज मंत्रालयाने हा दिवस ‘पेसा दिन,’ म्हणून साजरा करणेबाबत निर्देशित केले आहे.पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा सदस्य,पंचायत सदस्य, तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमताबांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी,तसेच त्यांचा या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये सहभाग वाढावा,यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने मेळावे,प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजित करून पेसा दिनाच्या कार्यक्रमांमध्ये पेसा कायद्याच्या वैशिष्ट्यांबद्दल जनजागृती करावी व पेसा कायद्याच्या तरतुदीचे वाचन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत, तसेच पेसा कायद्याशी संबंधित वन विभाग,महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आदिवासी विकास विभाग,सामाजिक न्याय विभाग,खनिकर्म विभाग यांनाही आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ग्रामपंचायत अंतर्गत सर्व पेसा गावांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींतर्गत पेसा गावांमध्ये पेसा कायद्याविषयी जनजागृती करावी, नागरिकांपर्यंत पेसा कायद्याची माहिती देण्यासाठी विविध उपक्रम साजरे करावे, नागरिकांनीदेखील या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पेसा दिवस साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

