संदीप जाधव,बोईसर,
अनधिकृत दगड वाहतुकीचा प्रश्न गंभीर,गावगुंडाचा हैदोस, कडक कारवाईची मागणी,
बोईसर पूर्व भागातील अनधिकृत दगड वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.या बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी मौजे गुंदले सजाचे तलाठी हितेश राऊत यांनी पाऊल उचलले असताना कारवाई दरम्यान एका ट्रक मालकाने धक्काबुक्की केली.
काल तलाठी राऊत यांनी अनधिकृत दगड वाहतुकीवर कारवाई करत तीन ट्रक थांबवले.त्यावेळी ट्रक मालक धीरज सुधीर भंडारी याने त्यांना धक्काबुक्की केली आणि कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता व परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलीस बोलावण्यात आले,ज्यांच्या मदतीने ट्रक ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता ( बी.एन.एस ) 2023 नुसार कलम 132, 121, 115, 352, 315(2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1. म्हणून – MH04 -CG- 4152 – प्रशांत राऊत,
2. MH04-3E-4494 – भूषण बांदिवडेकर,
3. MH04-EL-0465 – धीरज सुधीर भंडारी,
चौकट
बोईसर पुर्व परिसरातील अनधिकृत दगड खाणी आणि वाहतूक समस्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे.वारंवार होणाऱ्या कारवायांनंतरही या बेकायदेशीर कामांवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. तलाठी राऊत यांच्यासारखे अधिकारी जिवाची बाजी लावून कारवाई करत असले तरी,अशा घटनांमुळे या भागातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
चौकट –
घटनेच्या वेळी बोईसर मंडळ अधिकारी विजय गुंडकर आणि तलाठी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. “अनधिकृत दगड वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही.दोषींना कठोर शिक्षा होईल,” असा इशारा मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी दिला आहे.
चौकट
अनधिकृत दगड वाहतुकीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून,स्थानिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.या प्रकरणात पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.मात्र,या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि सरकारने एकत्र येऊन ठोस उपाययोजना करावी,अशी मागणी होत आहे.अनधिकृत खाण व वाहतूक थांबवण्यासाठी सरकारने त्वरित कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा महसूल विभागाच्या संघटनांकडून करण्यात येत आहे.

