जव्हार प्रतिनिधी,
सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराला उत्साहात सुरुवात,
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जव्हार राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराला आज नांगरमोडा (दत्तमंदिर) येथे उत्साहात सुरुवात झाली.शिबिराचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जव्हार पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर मानभाव,पतंगशाह कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भरतकुमार महाले, माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य सुरेश कोरडा, ग्रामपंचायत सदस्य रमेश जंगली,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.आर.मेश्राम,हे उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी किशोर मानभाव यांनी विद्यार्थ्यांना नीतिमूल्ये जपण्याचे आणि प्रामाणिक राहण्याचे महत्व पटवून दिले. तर डॉ.भरतकुमार महाले यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आरोग्य समस्या आणि चांगल्या आहाराचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.
सात दिवसांच्या या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.तसेच गावात श्रमदानाद्वारे स्वच्छता,रस्ते दुरुस्ती आणि इतर विकासकामे करण्यात येणार आहेत.यासाठी ग्रामपंचायत न्याहाळे सरपंच उज्वला कोरडा व उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच दत्त मंदिर ट्रस्ट, नांगरमोडा आणि स्थानिक ग्रामस्थांनी शिबिराला मोलाचे सहकार्य देऊ केले आहे.या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक,विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि श्रमसंस्काराची प्रेरणा मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

