दीपक मोहिते,
एक देश ; एक निवडणूक ; देशाची वाटचाल अध्यक्षीय पद्धतीच्या दिशेने,
बहुचर्चित एक देश,एक निवडणूक विधेयकाचा प्रस्तावावर मतप्रत्रिकेवर मतदान पार पडले.प्रस्तावाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ मते पडली.यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला.पण सरकारने संबंधित प्रस्ताव पटलावर ठेवला व तो मंजूर झाला.तत्पूर्वी इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे मतदान घेण्यात आले,पण त्यास विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे जाहीर केले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व घटक पक्ष ,” एक देश,एक निवडणूक,” च्या बाजूने आहेत,तर १४ पक्ष विरोधात आहेत.मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हे विधेयक संसदीय समितीकडे (जे.सी.पी.) पाठवण्यात आले आहे.त्यावर चर्चा होईल व सर्व पक्षांची मते ऐकली जातील. त्यानंतर नवीन विधेयक तयार करण्यात येईल.त्यावर सहमती होण्यासाठी विधेयक संसदेत सादर होईल.या विधेयकावर बोलताना कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले,देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याचे हे विधेयक राज्यांची शक्ती कमी करणार नाही.हे विधेयक पूर्णपणे संविधानाला अनुसरून आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार ही प्रणाली लागू झाली तर पैसा व वेळेची बचत होणार आहे.पण विरोधी पक्षांना मात्र ही पद्धत अवलंबल्यास देशाची वाटचाल,अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीच्या दिशेने होईल,अशी भिती वाटत आहे.त्यामुळे केंद्र सरकार,हे विधेयक सर्वसंमतीने पारीत व्हावे,यासाठी प्रयत्नशील आहे.

