वसंत भोईर,वाडा,
वाड्यातील माध्यमिक शाळांमध्ये स्वसंरक्षण विषयी समुपदेशन,
वाडा शहरातील एका नावाजलेल्या माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाकडून अलिकडेच विद्यार्थीनींची छेडछाड करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर येथील पोलीसातर्फे तालुक्यातील सर्वच माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थीनींच्या स्वसंरक्षणविषयी समुपदेशन कार्यक्रमांचे आयोजन काल करण्यात आले होते.
आज सकाळी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा येथील शिक्षिकांनी एकत्र येऊन या विद्यालयातील तिनशेशेहून अधिक विद्यार्थीनींना एकत्र करून चांगला स्पर्श ( गुड टच ) व वाईट स्पर्श ( बॅड टच ) तसेच स्वसंरक्षणविषयी समुपदेशन केले.अशा प्रकारचे समुपदेशन आज तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये वाडा पोलीसांच्या सहकार्याने पार पडले.
शालेय परिसरात विद्यार्थीनींना कोणी त्रास देत असतील,तर त्याबाबतची माहिती न लपवता,न घाबरता शाळेच्या मुख्याध्यापकांना त्वरीत कळवावी,असे आवाहन सहशिक्षिका प्रांजळ भोईर यांनी या कार्यक्रमात केले.

