दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
सुधीर मुनगुंटीवार यांचा एकनाथ खडसे होण्याची दाट शक्यता,
राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवर प्रचंड नाराज झाले असून ते लवकरच केंद्रीय नेते नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.मुनगुंटीवार हे नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यांना डावलण्यामागे भाजपमधील एका गटाचे कारस्थान असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
सुधीर मुनगुंटीवार हे भाजपमध्ये ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.२०१४ साली भाजप – शिवसेना युतीला यश मिळाल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्नशील होते,पण त्यावेळी त्यांची गडकरी यांनी समजूत काढली व त्यांनी माघार घेतली.त्यांच्या माघारीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला होता.मात्र या नेत्याच्या डोक्यातील सल मात्र निघू शकली नाही.गेल्या लोकसभा निवडणुकीत ते उमेदवारीसाठी इच्छुक नसतानाही त्यांना बळजबरीने तिकीट देण्यात आले.तसेच त्यांचा या निवडणुकीत पराभव घडवून आणला.या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.अडीच वर्षानंतर राज्यात नेतृत्व बदल होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे त्यांनी आपले नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून आपली कैफियत त्यांच्या कानावर घालण्याचे ठरवले आहे.एकनाथ खडसे यांच्यानंतर सुधीर मुनगुंटीवार बळी देण्यासाठी भाजपमधील एक गट सक्रिय झाला आहे.खडसे सोबत पंकजा मुंडे यांनाही या गटाने गेली पाच वर्षे चांगलाच मनस्ताप दिला होता.त्यांच्या पडद्यामागील कारवायांमुळे मुंडे या काही काळ अडगळीत पडल्या होत्या.पण त्यांनी सबूरी ठेवल्यामुळे त्यांचे पुनर्वसन होऊ शकले.जो मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत उतरतो,त्याच्या नशिबी वाईट दिवस येतात,असा आजवरचा अनुभव आहे.त्यामुळे या प्रकरणी नितीन गडकरी देखील फारसे काही करू शकतील,असे वाटत नाही.

