दीपक मोहिते,
मंत्रिमंडळाचे घोडं अखेर गंगेत न्हालं,
नव्या मंत्रिमंडळाचा आज नागपूर येथे शपथविधी पार पडला.आज एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली,त्यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.पण या शपथविधी सोहळ्यामध्ये केवळ भाजपच ” सबकुछ,” अशी स्थिती होती.गणेश नाईक व पंकजा मुंडे या दोघांचे प्रदीर्घ वनवासानंतर पुन्हा एकदा पुनर्वसन झाले.मात्र भाजपच्या गोतावळ्यात सुधीर मुनगुंटीवार व रविंद्र चव्हाण मात्र पाहायला मिळाले नाहीत.त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.पण सुधीर मुनगुंटीवार यांना नारळ देण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सुरुवातीला भाजपच्या १५ जणांना मंत्रिपदे मिळणार,असे ठरले असताना ती संख्या १९ पर्यंत वाढवण्यात आली व अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली.शिंदे गटाचे अब्दुल सत्तार,दीपक केसरकर,तानाजी सावंत,अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.त्यामुळे ही मंडळी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते.
भाजपने नितेश राणे,शिवेंद्रराजे भोसले,चंद्रशेखर बावनकुळे,गणेश नाईक,पंकज भोयर,मेघना बोर्डीकर,आकाश फुंडकर,अशोक उईके,आशिष शेलार यांना संधी दिली आहे.शिंदे गटाने प्रताप सरनाईक,भरत गोगावले,संजय शिरसाट,प्रकाश आबिटकर व योगेश कदम तर अजित पवार गटाने नरहरी झिरवळ,दत्ता भरणे,बाबासाहेब पाटील,इंद्रनील नाईक,यांना संधी दिली आहे.मंत्रिमंडळाचा आकार १९.११.०९ असा झाला आहे.

