संजय लांडगे,
वाडा येथे महिलांसाठी कर्करोग तपासणी व निदान शिबीर संपन्न,
रोटरी क्लब ऑफ मुंबई डाऊनटाऊन सीलॅण्ड,डॉ. कॅप्टन रितू बियानी ( संस्थापक कर्करोग संस्था, पुणे) व टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथे आज परिसरातील महिला वर्गासाठी मोफत कर्करोग तपासणी आणि निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
जगभरात महिला वर्गामध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे.याबाबत महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळून या गंभीर आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.कर्करोगाचे वेळेत निदान होणे आणि योग्य उपचार पद्धती घेणे,अशी दक्षता घेतल्यास या दुर्धर आजारावर मात करणे, सहजशक्य आहे. महिलावर्गामध्ये हेच प्रबोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू आणि ज्येष्ठ संशोधक तथा रोटरी क्लब ऑफ मुंबई डाऊनटाऊन सीलॅण्डचे अध्यक्ष डॉ.अरुण दामोदर सावंत यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या आजाराबाबत डॉ.रितू बियानी यांनी शिबिराच्या सुरुवातीला उपस्थित महिलावर्गाला चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करून त्यानंतर आलेल्या वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी आणि निदान सत्र पार पाडले. परिसरातील शेकडो महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

