संजय नेवे,विक्रमगड,
सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार,
मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी पी.एम.रूम ग्रामीण रुग्णालयमध्ये असणे आवश्यक असते.विक्रमगड ग्रामीण रुग्णालयामध्ये चार-पाच वर्षांपूर्वी हे शवविच्छेदन कक्ष बांधण्यात आले आहे.परंतु गेल्या चार ते पाच वर्षापासून या कक्षाचा वापरच होत नाही.ते बंद पडून आहे,त्याचा वापर का करण्यात येत नाही,असा सवाल विचारण्यात येत आहे.
शवच्छेदन रूम कधी सुरू होणार या शवविच्छेदन रूममध्ये पाणीपुरवठा,लाईट, ड्रेनेज, इ.कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे ते सुरू होत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या सोयी व सुविधा कधी मिळणार ? असा प्रश्न या भागातील लोकप्रतिनिधींनी विचारला आहे.मुख्य इमारतीच्या मागील बाजूस तात्पुरता स्वरूपाचे शवविच्छेदन कक्ष उभारण्यात आले आहे.परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण रुग्णालय प्रशासन अपूर्ण असलेल्या सुविधा देण्यात असमर्थ ठरले आहेत. शवविच्छेदन कक्ष सुरू करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता व ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा,यामुळे हे शवविच्छेदन कक्ष गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे.ते त्वरित सुरु करण्यात यावे,अन्यथा मनसे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करील,असा इशारा विक्रमगड तालुकाप्रमुख योगेश पाटील यांनी दिला आहे.

