नवीन पाटील,सफाळे,
” News 27.In Media,” वेबपोर्टल बदलत्या पत्रकारितेचा उगवता सूर्य…
आधुनिकतेची कास धरत सध्या सर्वच क्षेत्रात नवनवीन पद्धत अवलंबण्यात येत असताना पत्रकारिता क्षेत्रातही नव्या पर्वाची सुरुवात होत झाली आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ही माध्यम क्षेत्रापुरता मर्यादित न राहता वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आता पत्रकारिता डिजिटल झाली आहे.
याच धर्तीवर पालघर जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांनी डिजिटल पत्रकारितेत उतरून नव्या पर्वाला सुरवात केली आहे.
पत्रकारिता क्षेत्रात गेली अनेक दशके आपल्या सडेतोड आणि परखड लेखणीतून प्रशासन राजकीय क्षेत्रात आपला आगळा – वेगळा ठसा उमटवणारे वसई तालुक्यातील जेष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांनी गावकरी,लोकमत, पुढारी,सागर,प्रहार,सारख्या नामवंत दैनिकांतून गेली अनेक दशके पत्रकारिता केली. सर्वसामान्यांच्या समस्यांना त्यांनी प्रभावीपणे आपल्या सडेतोड लेखणीतून न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. या वाटचालीत त्यांनी “ सूर्यातीर,” या त्यांच्या विशेष सदरातून जिल्ह्यातील विविध विषयांवर लिखाण करून प्रशासकीय यंत्रणांच्या डोळ्यात अंजन घातले. त्यांनी जिल्ह्यातील अनेक होतकरू तरुणांना पत्रकारितेचे मार्गदर्शन करून आजवर दमदार फळी उभारली.
गेल्या काही वर्षात सर्वच क्षेत्र डिझीटल झाले असून पत्रकारिता देखील त्यापासून दूर राहू शकली नाही.त्याचेच एक रूप म्हणून जेष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांनी ” News 27. In Media,” हे वेबपोर्टल सहा महिन्यापूर्वी सुरू केले.अल्पावधीतच या वेबपोर्टलला मुंबई, पालघर,ठाणे रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पुणे आणि नाशिक जिल्ह्यात या वेबपोर्टलला वाचकांची पसंती लाभली असून ४० हजार वाचकांचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे.
या वेबपोर्टलसाठी पालघर जिल्ह्यातून निवडलेल्या पत्रकारांची बैठक काल शुक्र. १३ डिसें. रोजी बोईसर पश्चिमेस नागझरी येथे माजी आ.राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बदलती पत्रकारिता आणि सोशल मीडिया याबद्दल संपादक दीपक मोहिते यांनी उपस्थित पत्रकाराना मार्गदर्शन केले.आ.राजेश पाटील यांनी देखील बदलत्या आणि आधुनिकतेच्या दिशेने जाणाऱ्या पत्रकारितेतून समाजाभिमुख आणि पारदर्शक लिखाण करण्याबाबत सूचना केल्या. खेळीमेळीच्या आणि चर्चेच्या माध्यमातून पत्रकारितेच्या नव्या पर्वाला प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ज्वलंत विषयांवर परखड लिखाण करण्यासाठी आधुनिक पत्रकारितेची सुरुवात झाली आहे.
” लिगसी अवॉर्ड २०२४,” या दिल्ली स्थित नामवंत संस्थेतर्फे दीपक मोहिते यांना जाहीर झालेला पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जाता आले नाही.त्यामुळे संस्थेने तो त्यांना पाठवून दिला,तो पुरस्कार आज झालेल्या कार्यक्रमात माजी आ.राजेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

