जव्हार प्रतिनिधी,
आयरे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिले कायद्याचे ज्ञान,
आयरे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन देण्यासाठी जव्हार पोलीस विभागातर्फे विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या सत्रात पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना कायद्याची ओळख व जबाबदारीची जाणीव करून दिली.
पोलीस शिपाई प्रदीप विटकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी विविध पदांची माहिती दिली.त्यांनी पोलीस भरती प्रक्रिया,शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व,तसेच अभ्यासाची योग्य पद्धत,यावर सखोल मार्गदर्शन केले. शिवाय,मोबाईलचा मर्यादित वापर,विनापरवाना वाहन चालवण्याचे दुष्परिणाम, आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी बाळगणे याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली.
हेमंतकुमार डामसे यांनी पोक्सो कायद्याविषयी माहिती देताना बालविवाहाचे दुष्परिणाम,त्याची सामाजिक व कायदेशीर परिणामकारकता विद्यार्थ्यांसमोर मांडली.त्यांनी कमी वयात लग्न करणे,गुन्हा कसा आहे,याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
महिला पोलीस कर्मचारी एस.डी.पाटील यांनी विद्यार्थिनींना अन्याय व अत्याचाराविरुद्ध जागरूक राहण्यासंदर्भात महत्त्व पटवून दिले.त्यांनी लैंगिक शोषण व छेडछाडीच्या घटनांना तोंड देण्यासाठी कायदेशीर उपाय व मदत विषयक माहिती दिली. विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारच्या त्रासास सामोरे जावे लागल्यास जव्हार पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करत,त्यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांकही दिला. ” मी नेहमी तुमच्यासोबत आहे,” असा विश्वास पाटील यांनी विद्यार्थिनींना दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत रूकारी यांनी केले. सूत्रसंचालन चव्हाण यांनी तर सचिन भामरे यांनी आभार प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांना पोलीस विभागाकडून मिळालेली ही माहिती निश्चितच प्रेरणादायक ठरली असून,कायदा आणि स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.

