नवीन पाटील, सफाळे,
पिकअप टेम्पो- बाईकच्या अपघातात एक ठार,दोन जखमी,
मनोर मार्गावर गुरूवारी भीषण अपघात झाला आहे.या अपघातात एका दुचाकीवरून जात असलेल्या भाऊ बहिणींपैकी भावाचा मृत्यू झाला आहे.तर बहीण गंभीर जखमी झाली आहे.
या व्यतिरिक्त आणखी एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.विशाल यादव,असे या अपघातातील मृत दुचाकीस्वार तरूणाचे नाव आहे.
पालघर तालुक्यातील मनोर येथील धुपोंडापाडा येथे राहणारे विशाल चांदमल यादव ( १९ ) आणि त्याची बहीण डिंपल चांदमल यादव ( २२ ) हे दोघे दुचाकीने पालघरच्या दिशेने निघाले होते. पालघर- मनोर मार्गावर गोवाडे गावाच्या हद्दीत एका वळणावर भरधाव पिकअप टेम्पोने विशाल यादव चालवत असलेल्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली.
त्याच सुमारास मनोरच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीला देखील या पिकअप टेम्पोची धडक बसली.या दुहेरी अपघातात विशाल हा गंभीर जखमी झाला.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार विशाल यादव याचा जागीच मृत्यू झाला आहे.तर त्याची बहीण डिंपल यादव ही देखील गंभीर जखमी झाली आहे. तसेच,या आपघातात दुसरा दुचाकीस्वार रुपेश डगला ( २२ ) हा देखील जखमी झाला आहे.
या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात पिकअप टेम्पो चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (अ) (ब), ३२४ (४) मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी पिकअप टेम्पोचालक शाद अजमल कुरेशी ( ४९ ) याला मनोर पोलिसांनी अटक केली आहे.

