जव्हार प्रतिनिधी,
धानोशी येथे महिला मेळावा उत्साहात साजरा,
एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प-१ तर्फे धानोशी ग्रामपंचायतीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजयाताई लहारे होत्या.यावेळी धानोशी ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू पवार,उपसरपंच भगवान पालवी, व ग्रामपंचायत सदस्य ज्योती घेगड व सविता फरळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केली.त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षिका सरला मेतकर यांनी महिला मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांना प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ.भावना घोलप यांनी महिलांना योग अभ्यास व योग धारणा,यांचे महत्व सांगितले आणि महिलांचे हक्क व अधिकार,याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
चेतन शेवाळे पंचायत समिती जव्हार) यांनी ” कालची स्त्री व आजची स्त्री,” या विषयावर विविध उदाहरणांसह महिलांचे समाजात असलेले महत्व विशद केले.मनोज कामडी (तालुका व्यवस्थापक,पेसा) यांनी पेसा कायदा माहिती,केंद्र,राज्य शासनाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यावर मार्गदर्शन केले.रामकृष्ण (इस्कॉन संस्था) यांनी महिलांना स्वयंरोजगार, महिला बचत गट,आणि गावातील प्रमुख समस्यांवरील उपाय सांगितले.
विष्णू पवार ( सरपंच,धानोशी ग्रामपंचायत ) यांनी गाव विकासासाठी लोकसहभागाचे महत्व,तंटामुक्ती समितीची भूमिका व महिलांसाठी राबवलेल्या उपक्रमांबाबत चर्चा केली.कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षा विजयाताई लहारे (सभापती, जव्हार पंचायत समिती) यांनी महिलांचे आरक्षण, सामाजिक-आर्थिक व राजकीय प्रगती,तसेच ग्रामसभेत महिलांनी आपले हक्क व अधिकार मांडण्याचे महत्व उपस्थित महिलाना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी महिलांसाठी संगीत खुर्ची आणि चमचा-लिंबू खेळांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महिलांनी मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प जव्हार १ पर्यवेक्षिका एस.व्ही.मेतकर,एस. व्ही.भोये,पी.आर.शेळके, यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या,ग्रामपंचायत अधिकारी यु.डी.वाघ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,व महिला बचत गटांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

