संजय लांडगे,वाडा शहर,
मांगरूळ येथे जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन स्वच्छतागृह,
वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांगरूळ शाळेसाठी स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्याचा महत्वाचा उपक्रम राबवण्यात आला. के.पी.टी.पाईप्स यांच्या सी.एस.आर.कार्यक्रमांतर्गत, रोटरी क्लब ऑफ मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स,फिनेट मीडीया,अभी & नियु ( Following Love ), आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी झाला.
ही शाळा पूर्वीपासून स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृहाच्या सुविधेपासून वंचित होती.विशेषतः मुलींना स्वच्छतागृहाच्या अभावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.शाळेतील ही गरज लक्षात घेऊन के.पी.टी. पाइप्स यांनी जि.प.शाळेसाठी तीन मुलींसाठी आणि तीन मुलांसाठी असे एकूण सहा स्वच्छतागृह बांधून दिले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.या उद्घाटनप्रसंगी के.पी.टी.पाईप्सचे रिजनल हेड मंगेश पिंपळे,अभी आणि नियु ( Following Love ) चे संस्थापक अभिराज राजाध्यक्ष आणि नियती माविणकुरवे, रोटरी क्लब ऑफ मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सचे सचिव सुयोग गंगावणे,फिनेट मीडीयाचे टॅलेंट मॅनेजर सूरज साबोजी,ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह चे संस्थापक आणि ” सोलार मॅन ऑफ इंडिया,” म्हणून ओळखले जाणारे डॉ.सचिन शिगवण, रोटेरियन इंजिनीअर मोहित वैद्य,रोटरॅक्टर इंजिनीअर निशांत पाटील,शाळेचे मुख्याध्यापक संजय माढे, तसेच शाळेचे इतर शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून मुलांना स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाचे महत्व या विषयी सविस्तर माहिती दिली.सदर प्रकल्पामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित शाळा परिसर मिळण्यास हातभार लागला आहे.मुलींसाठी विशेषतः हा प्रकल्प आरोग्य आणि शिक्षण यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल.के.पि.टी. पाइप्स आणि इतर सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे यासाठी शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक ग्रामस्थांनी आभार मानले.

