दीपक मोहिते,
पालघर जिल्हा परिषद चिंचले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार हक्काचे छत,
डहाणू तालुक्यातील चिंचले येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत व अंगणवाडीची इमारत मुंबई – वडोदरा महामार्गात जात असल्यामुळे महामार्ग बनवणाऱ्या कंपनीने जिल्हा परिषदेची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तोडल्या होत्या.त्यामुळे वर्षभरापासून या शाळेतील विद्यार्थी हे एका पत्राच्या छताखाली शिक्षण घेत होते.जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी वर्षभरापासून जिल्हा परिषदेमधील प्रत्येक स्थायी आणि सर्वसाधारण सभेमध्ये पोटतिडकीने हा विषय मांडत असत.नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा विषय काशिनाथ चौधरी यांच्याकडून मांडण्यात आला. या सभेमध्ये मुलांना शाळा उपलब्ध करून न दिल्यास जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे,जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,मंगेश भोईर,शैलेश करमोडा,पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, डहाणू प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी,यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सदर महामार्ग बनवणाऱ्या कंपनीचे अधिकारी,देखील उपस्थित होते.शाळेच्या नवीन वर्ग खोल्या आणि अंगणवाडी बांधून देणे,त्यासाठी लागणारी किमान दहा गुंठे इतकी जमीन व लागणारा वाढीव खर्च खास बाब म्हणून मंजूर करण्यात आली.शाळा व अंगणवाडीचे काम जमीन मालकाच्या संमतीने व काही प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येणार आहे.ज्या जागी शेड होते त्याच जागेवर मुलांची शाळा आणि अंगणवाडी लवकरात लवकर उभारण्यात येईल.वर्षभर मुलांनी शेडमध्ये शिक्षण घेतले असून आता त्यांना हक्काची इमारत मिळणार असल्याने पालकांनी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रकरणी नियमित पाठपुरावा केल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे चिंचणी गावातील नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
काशिनाथ चौधरी,
जिल्हा परिषद सदस्य,

