अनिल वैद्य,नाशिक,
नाशिक येथे लष्कराचे ” नो युवर आर्मी,” प्रदर्शनाचे आयोजन,
विद्यार्थ्यांना आणि तरुण पिढीला भारतीय सैन्य दलाच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी आणि देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने नाशिक येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील आर्टिलरी सेंटरतर्फे गुरुगोविंद सिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात मांडण्यात आलेल्या ” नो युवर आर्मी,” अर्थात ” आपल्या सैन्य दलाला जाणून घ्या,” या प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले.यावेळी गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष बलबीर सिंग छब्रा हे उपस्थित होते.देशातील युवक – युवतीना भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे,युवकांनी देशसेवेमध्ये सामील व्हावे,या उद्देशाने सैन्य दलाची ओळख करून देणाऱ्या नो युवर आर्मी हा प्रकल्प भारतीय सैन्य दलाकडून देशातील प्रमुख शहरांमध्ये राबवण्यात येत आहे.
नाशिक शहरात आयोजित या ” नो युवर आर्मी,” उपक्रमांतर्गत दोन प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून आज ७ डिसें.रोजी सशस्त्र सेना ध्वजदिनाच्या निमित्ताने महाविद्यालयीन युवक युवती तसेच अन्य युवक युवतींसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत पाकिस्तान दरम्यान १९७१ साली झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धाला ५३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १६ डिसें.रोजी विजय दिवसाच्या निमित्ताने १४ आणि १५ डिसें.या दोन दिवशी देशातील सैनिकी शिक्षण देणारी अग्रणी संस्था द हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.आज नाशिकच्या गुरुगोविंद सिंग फाउंडेशनच्या शिक्षण संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये भारतीय सैन्य दलातील लाईट फिल्ड गन, इंडियन फिल्ड गन,रशियन बनावटची फिल्ड गन,४५ सी ए एल धनुष मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर,सिस्टीम थर्मल इमेजिंग ऑब्झर्वेशन इक्विपमेंट शत्रूचा नेमका ठाव ठिकाणा शोधणारी लोरस सिस्टीम विविध प्रकारच्या रायफल्स आधी प्रत्यक्ष युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या तोफा शस्त्र व क्षेपणास्त्रे ठेवण्यात आली आहेत.उद्घाटन समारंभा नंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन भारतीय सैन्य दलाच्या क्षमता व कार्यपद्धतीबद्दल परिपूर्ण माहिती घेतली.यावेळी या प्रदर्शनातून मिळालेल्या माहितीमुळे,आपल्याला सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले,की युद्धाबद्दल खूप चर्चा होत असते,मात्र युद्धाच्या वेळी प्रत्यक्षात सैन्याची कार्यपद्धती, युद्धामध्ये प्रत्यक्षात वापरली जाणारी साधने,याची सविस्तर माहिती या अशा प्रदर्शनातून मिळत असते.त्यामुळे तरुण पिढीसाठी सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
भारतीय सैन्यदलाच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देणारे ” नो युवर आर्मी,” हे प्रदर्शन नाशिक बरोबरच मुंबई कोल्हापूर पुणे अहिल्यानगर येथेही भरवण्यात येणार आहे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या युवक युवती विशेषत: महाविद्यालयीन युवक युवतींनी सैन्य दलातील भरतीबद्दल सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.विशेष म्हणजे अग्नीवीर योजनेमध्ये कशाप्रकारे सहभागी होता येईल,याबद्दल विद्यार्थ्यांनी उत्सुकता दाखवली तसेच अनेक तरुणींनी सैन्य दलात भरती होण्यासाठी कशी प्रक्रिया आहे.याविषयी अनेक तरुण – तरुणींनी माहिती घेतली.

