दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कोणत्याही रंगाला करदात्यांचा आक्षेप नाही,पण सलोख्याचे वातावरण बिघडवू नका,
रंगात काय ठेवलं आहे.रंग हा इतर कोणत्याही रंगात मिसळला की तो वेगळा दिसायला लागतो,हे सारे रंग जेंव्हा एकत्र येतात,तेंव्हा मन मोहून टाकणारे इंद्रधनुष्य आकाराला येते.तेही क्षणिक डोळ्यांना सुख देते व आसमंतात विलीन होऊन जाते.पावसाळ्यात पाहायला मिळणाऱ्या इंद्रधनुष्य माझा प्रत्येक रंग निरपेक्ष असतो,हे दाखवून देत असतो.असो,आज मी साहित्याच्या भाषेत का बोलतोय ? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना ? त्याला कारणही तसच आहे.महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आता रंगाची ॲलर्जी होवू लागली आहे.कारण,सत्तेत परिवर्तन घडल्या,घडल्या पिवळा व हिरव्या रंगाची त्यांना उपरती झाल्याचे दिसून आले आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे उद्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धेच्या तीन ते चार अगोदर प्रशासन,रस्त्याची डागडुजी,रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे,साफसफाई व धावण्याच्या मार्गावर असलेल्या झाडांना पिवळा व हिरवा रंग मारत असते.ही स्पर्धा राष्ट्रीय दर्जाची असल्यामुळे देशभरातून स्पर्धक, या स्पर्धेमध्ये सामील होत असतात.त्यादृष्टीने आपली नगरी सजवण्याचा आपला प्रयत्न असतो.वास्तविक गेल्या १४ वर्षापासून ही प्रक्रिया सुरू आहे.झाडांना लावण्यात येणारे या दोन्ही रंगावर कोणत्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही.त्याकाळी महानगरपालिकेने पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेत हे रंग स्विकारले व ती प्रथा गेली १३ ते १४ वर्षे सुरूच आहे.पण नुकत्याच पर पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात सत्तापरिवर्तन झाले व मनपाच्या अधिकाऱ्यांनी नको तो उपद्व्याप सुरू केला.वास्तविक शासकीय कार्यक्रमात अधिकाऱ्यानी निष्पक्ष राहण्याची आवश्यकता आहे,किंबहुना तशी आचारसंहिताच आहे.पण या अधिकाऱ्यांनी साऱ्या मर्यादा ओलांडत रंग बदलला,तो बदलण्यामागे त्यांचा काय उद्देश आहे, देवजाणे.पण ते रंग का बदलण्यात आले,याविषयीची माहिती आम्हा करदात्यांना मिळाली पाहिजे,कारण तो आमचा मूलभूत अधिकार आहे.सरकारी कामकाजात पक्षीय राजकारण करणे,अधिकाऱ्यांना शोभा देणारे नाही.शांतप्रिय व सर्व जातीधर्माची एकत्रित मोट बांधणाऱ्या तालुक्यातील सलोख्याचे वातावरण बिघडवू नका,असे या अधिकाऱ्यांना सांगण्याची वेळ आली आहे.त्यांनी प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता ठेवावी,कोणत्याही पक्षाची पालखी वाहू नये,अन्यथा महानगरपालिकेचे करदाते तुमच्या तोंडाला काळा रंग फासतील,

